मुंबईत रंगणार पहिला महाराष्ट्र रेडिओ महोत्सव

महाराष्ट्रात प्रथमच ‘महाराष्ट्र रेडिओ महोत्सव’ हा विशेष कार्यक्रम मुंबईत आयोजित केला जात आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्यावतीने जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने या अनोख्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा महोत्सव दिनांक २१ जून 2025 रोजी नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात पार पडणार आहे. कार्यक्रमात रेडिओ जगतातील मान्यवरांचा सहभाग असून, राज्याचे मुख्यमंत्री एकाच मंचावर पाच लोकप्रिय रेडिओ निवेदकांशी थेट संवाद साधणार आहेत.
या पाच निवेदकांमध्ये सिद्धू रेड एफएम, अक्की मॅजिक एफएम, अर्चना रेडिओ सिटी, प्रेरणा रेडिओ मिर्ची आणि अभिलाष बिग एफएम यांचा समावेश आहे. संवादाचे सूत्रसंचालन हेनल मेहता करत असून, संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन ज्येष्ठ पत्रकार अंबरिश मिश्र करणार आहेत.
कार्यक्रमात विविध रेडिओ पुरस्कारांचं वितरण होणार आहे. सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार म्हणजे ‘आशा रेडिओ गौरव पुरस्कार’, जो सुप्रसिद्ध गायिका आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त आशा भोसले यांच्या नावे देण्यात येणार आहे. याशिवाय नवोदित कलाकार, सामाजिक कामासाठी केलेले रेडिओ योगदान, लोकाभिमुख कार्यक्रम यासाठी सुद्धा सन्मान दिले जातील. या महोत्सवात सुदेश भोसले, श्रीकांत नारायण, संजीवनी भेलांडे यांच्यासारख्या प्रसिद्ध गायक-कलाकारांचे सांगीतिक कार्यक्रम सुद्धा रंगणार आहेत. कार्यक्रमाचा प्रवेश सर्वांसाठी मोफत असून, तो दुपारी दोन वाजता सुरू होणार आहे.