तोंडवली-तळाशील किनारा

सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील सागरकिनाऱ्यावर विसावलेला एक जिल्हा आहे. या जिल्ह्यात गडकिल्ले, जलदुर्ग तसेच अप्रतिम आणि सुबक अशी पुरातन मंदिरे आहेत. अशा या सौंदर्यसंपन्न सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सौंदर्य देश-विदेशातील पर्यटकांना भुरळ घालणारे आहे. जिल्ह्यातील मालवण तालुक्यात असलेला तोंडवली-तळाशील किनारा अप्रतिम आहे. येथे डोळ्याचे पारणे फेडणारे निसर्गसौंदर्य आणि चालण्यासाठी रुपेरी वाळू आहे. तोंडवली हे गाव मालवण तालुक्यात कालावल खाडी आणि अरबी समुद्रामध्ये आहे. हे मालवणपासून सुमारे २५ किमी आणि कणकवलीपासून ४५ किमी अंतरावर आहे. जिल्ह्याचे मुख्यालय ओरोसवरून २८ किलोमीटरच्या अंतरावर, मालवणपासून वीस किलोमीटर अंतरावर आहे. मालवण-आचरा रस्त्यावरून तोंडवली फाट्यावरून आत गेल्यावर एका वळणावर समुद्राचे दर्शन होते.

सिंधुदुर्गातील गड नदी तोंडवलीकडे समुद्राला भेटायला येते. तळाशीलपर्यंत ती समुद्राला समांतर वाहते. तळाशीलला नौकेची सुविधा उपलब्ध आहे. तळाशीलची मच्छिमारांची वस्ती संपली की, पुढे ओसाड बेट आहे. गडनदी समुद्राला मिळते ती जागा फार सुंदर आहे. तोंडवली ते तळाशीलचा सागरकिनारा दोन ते तीन किलोमीटरचा सुंदर आणि स्वच्छ आहे. तळाशील समुद्रकिनाऱ्याच्या पुढे सर्जेकोट किल्ला आणि सर्जेकोट बंदर पहायला मिळते. सर्जेकोट बंदरापासून तळाशील बोटीनेसुद्धा पर्यटक प्रवास करू शकतात. तेथील स्थानिक आकर्षणे दाखविण्यासाठी पर्यटकांसाठी बोटीची सुविधा असते. तळाशील समुद्राच्या मध्यभागी एक लहानसे बेट असून त्याला ‘शिंपला पॉईंट’ असे म्हणतात. या किनाऱ्यावर डॉल्फिनचे सुद्धा दर्शन होते. तोंडवली गावातील सुरूचे बन रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सुरू होते. या बनाचे निसर्गसौंदर्य पाहताना खूप मजा येते. या सुरूच्या बनामध्ये पक्ष्यांचे आवाज ऐकायला मिळतात. त्यामुळे पर्यटकांना आनंद देणारा हा किनारा आहे.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
17,981 वेळा पाहिलं