
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता तिकिटाव्यतिरिक्त अतिरिक्त वापर शुल्क भरावे लागणार आहे. विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरणाने तात्पुरत्या स्वरूपात ‘वापरकर्ता विकास शुल्क’ म्हणजेच युडीएफ आकारण्यास मान्यता दिली आहे. हे शुल्क देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही प्रवाशांवर लागू होणार आहे.
देशांतर्गत उड्डाण करताना प्रवाशांना सहाशे वीस रुपये, तर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी एक हजार दोनशे पंचवीस रुपये भरावे लागतील. आगमनावेळी देशांतर्गत प्रवाशांसाठी दोनशे सत्तर रुपये, आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी पाचशे पंचवीस रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. हे दर तात्पुरते असून, पुढील आर्थिक वर्षासाठी अंतिम दर निश्चित करण्यात येतील.
सध्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर देशांतर्गत प्रवासासाठी दोनशे सात रुपये, आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी सातशे सहवीस रुपये इतके युडीएफ आकारले जाते. याच्या तुलनेत नवी मुंबईतील दर काहीसे अधिक आहेत, मात्र ते प्रारंभिक स्वरूपाचे असल्याने भविष्यात बदल होण्याची शक्यता आहे.
नवी मुंबई विमानतळाच्या उभारणीसाठी एकूण अंदाजे सत्तावन्न हजार तीनशे तेहेचाळीस कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यातील पहिल्या टप्प्यातील बावीस हजार पाचशे एकतीस कोटी रुपयांचा खर्च सुरू आहे. त्याचा काही भार प्रवाशांवर टाकण्यात येणार आहे. हे शुल्क तिकिटामध्येच समाविष्ट असेल, त्यामुळे वेगळी रक्कम भरावी लागणार नाही.