रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीसाठी पश्चिम रेल्वेचा मेगाब्लॉक

पश्चिम रेल्वेने रविवार दिनांक ८ जून २०२५ रोजी चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान पाच तासांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. हा ब्लॉक सकाळी १०:३५ ते दुपारी ३:३५ या वेळेत उपनगरीय मार्गाच्या स्लो लाइन्सवर घेतला जाणार आहे. या कालावधीत ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभाल व दुरुस्तीची कामे केली जातील स्लो मार्गावरील सर्व लोकल गाड्या या कालावधीत फास्ट मार्गावर वळवण्यात येतील.

काही अप आणि डाऊन लोकल गाड्या रद्द करण्यात येतील. काही गाड्या बांद्रा किंवा दादर येथे थांबवण्यात येतील किंवा उलटवण्यात येतील. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, त्यांनी प्रवासाचे नियोजन करताना या मेगाब्लॉकचा विचार करावा आणि वेळापत्रक तपासूनच प्रवास करावा. या देखभाल कामांमुळे प्रवाशांना होणाऱ्या असुविधेबद्दल प्रशासनाने दिलगीरी व्यक्त केली आहे. अधिक माहितीसाठी आणि अद्ययावत वेळापत्रकासाठी प्रवाशांनी पश्चिम रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी किंवा स्थानकांवरील सूचना फलक तपासावेत.