पाळणाघर सुरू करताना

‘पाळणाघर’ ही शहरी भागात राहणाऱ्यांची गरज बनली आहे. विभक्त कुटुंबपद्धतीमुळे पाळणाघराचे महत्त्व दिवसेंदिवस वाढू लागले आहे. नोकरीमुळे मुलांच्या वेळेसोबत आई – वडिलांच्या कामाची वेळ जोडून घेता येत नाही. नोकरदार पालकांसाठी मुलांची सुरक्षितता हा महत्त्वाचा विषय आहे. गृहिणी आपल्या घरी हा व्यवसाय सहज सुरू करू शकतात. यासाठी विशेष आर्थिक गुंतवणुकीची गरज नसते. लहान मुलांची आवड असणाऱ्या महिला या व्यवसायात अधिक यशस्वी ठरतात. आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे पाळणाघरातील मुलांची जबाबदारी घ्यावी लागते. मासिक तत्त्वावर पाळणाघर चालते. त्यामुळे पालकांकडून आकारली जाणारी रक्कम ही मुलं पाळणाघरात कितीवेळ राहणार यावर अवलंबून असते.
मुलांनी पाळणाघरात रमण्यासाठी त्यांना खिळवून ठेवणाऱ्या गोष्टी उदा. खेळणी, चित्रांची पुस्तके, गोष्टींची पुस्तके यांची उपलब्धता असणे आवश्यक आहे. पाळणाघरात जेवण, अल्पोपहार, सुका खाऊ या सर्व गोष्टी मुलांच्या वाढीच्या दृष्टीने पोषक आणि पोटभरीच्या असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे पाळणाघरात वेगवेगळ्या छोट्या स्पर्धांचे आपण आयोजनही करू शकतो उदा. चित्रकला स्पर्धा किंवा काही खेळ्यांच्या स्पर्धा. यामुळे पाळणाघरात येणारी मुलं ही एकमेकांशी जोडली जातील. पाळणाघरातील वातावरण आनंदी राहील. त्याचा फायदा मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर होईल.
पाळणाघरात येणारी मुले ही संस्कारक्षम वयातील असतात. पाळणाघर चालवणाऱ्या मंडळींनाच त्यांच्यावर चांगले संस्कार करायचे असतात, त्यांना जाणून घेऊन त्यांच्यातील सकारात्मक गोष्टींना, छंदांना पैलू पाडायचे असतात.
किमान एका मुलाला ३० चौरस फूट जागा लागते असे मानून आपल्याकडे उपलब्ध जागेमध्ये किती मुले सामावली जाऊ शकतात याचा अंदाज घ्यावा. उपलब्ध जागेपेक्षा अधिक मुलांचा भरणा करू नये. पाळणाघराची खोली स्वच्छ आणि नैसर्गिक हवा – उजेड येणारी हवी. पाळणाघरात लहान मुलांच्या दृष्टीने आवश्यक प्रथमोपचार पेटी हवी. जेणेकरून कधी काही पटकन झालं, तर डॉक्टरांकडे नेईपर्यंत आपण त्याच्यावर प्राथमिक औषधोपचार करू शकतो.