मुंबई विधानभवनात वंदे मातरमच्या दीडशे वर्षांचा गौरव सोहळा

‘वंदे मातरम्’ हे केवळ एक गीत नसून, भारतातील प्रत्येक नागरिकासाठी तो एक पवित्र मंत्र आहे, ज्यामधून देशातील प्रत्येक भारतीय एकमेकांशी भावनिकदृष्ट्या जोडला गेलेला आहे. ‘वंदे मातरम्’ या गीतातून भारताच्या ऐतिहासिक सुवर्णकाळाची, स्वातंत्र्यासाठी लढलेल्या वीरांच्या बलिदानाची आणि देशाच्या सांस्कृतिक ऐक्याची भावना प्रकट होते, असे विचार विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केले.

मुंबईतील विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये ‘वंदे मातरम्’ गीताच्या दीडशे व्या वर्धापन दिनानिमित्त एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास विधान परिषदेचे सदस्य अमोल मिटकरी, विधिमंडळाच्या सचिव मेघना तळेकर, सचिव डॉ. विलास आठवले, सचिव शिवदर्शन साठे, विधान परिषदेच्या सभापतींचे सचिव पंडीत खेडकर, तसेच विधानसभा अध्यक्षांचे सचिव सुनील वाणी आणि विधिमंडळातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या प्रसंगी अध्यक्ष ॲड. नार्वेकर म्हणाले की, “वंदे मातरम् या गीताचा दीडशे वर्षांचा गौरवशाली इतिहास पाहताना आपल्याला त्यातील शौर्य, देशभक्ती आणि समर्पणाच्या भावना स्मराव्या लागतात. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत सर्वप्रथम सादर केले आणि त्यानंतर ते प्रत्येक राष्ट्रीय समारंभात अभिमानाने गायले जाते. आज हे गीत केवळ भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात घुमताना ऐकू येते.”

अध्यक्ष ॲड. नार्वेकर पुढे म्हणाले की, “जो कोण भारताची अस्मिता, संस्कृती आणि इतिहास प्रेमाने स्वीकारतो, तो प्रत्येक वेळी ‘वंदे मातरम्’चा जयघोष करतो. हे गीत आपल्याला देशाच्या एकतेची, सामर्थ्याची आणि अभिमानाची जाणीव करून देते.”

शेवटी त्यांनी आवाहन केले की, “येणाऱ्या काळात आपण सर्वजण या गीताचे अभिमानाने गायन करत राहू आणि आपल्या राष्ट्राच्या महान परंपरेला पुढे नेण्याचे कार्य निष्ठेने पार पाडू. ‘वंदे मातरम्’ ही भावना सदैव प्रत्येक भारतीयाच्या हृदयात जिवंत राहील.”






15,292 वेळा पाहिलं