
समर्थ रामदास स्वामींनी महाराष्ट्रात मारुती मंदिरांची स्थापना केली. यापैकी सातारा जिल्ह्यात ७ मारुती मंदिर आहेत. लोकांमध्ये परस्परांविषयी आत्मियता निर्माण करण्यासाठी रामजन्म आणि हनुमान जन्म सोहळे सुरु झाले. ही मंदिरे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी असते. या मंदिरातील हनुमंताच्या मुर्त्या वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगवेगळ्या आहेत. या मंदिरांमध्ये रामजन्म तसेच हनुमान जयंतीला मोठी गर्दी असते.
साताऱ्यात कराड-मसूर रस्त्यावर सुमारे 9 ते 10 कि.मी अंतरावर शहापूरचा फाटा आहे. शहापूरमध्ये इसवी सन १५६६ मध्ये मंदिराची स्थापना झाली आहे. शहापूरच्या मारुतीची मूर्ती चुन्यापासून बनविलेली असून ६ फूट उंच आहे, म्हणून याला ‘चुन्याचा मारुती’ असेही म्हटले जाते.
दुसरे मंदिर महारुद्र मारुती हे असून ते मसूरच्या ब्रम्हपुरीभागात आहे. चाफळ येथील ‘दास मारुती’ मंदिरात श्रीरामासमोर दोन्ही कर जोडून उभा असलेली मारुती आहे. दास स्वरूपातील हे मंदिर आजही चांगल्या स्थितीत आहे. इसवी सन १५७१ मध्ये खडीचा मारुती शिगणवाडी मंदिराची स्थापना केली. या मारुतीला ‘खडीचा मारुती’ अथवा ‘बालमारुती’ असेही म्हणतात.
उंब्रज येथील मठातील मारुतीची स्थापना इसवी सन १५७० मध्ये झाली. समर्थ रामदास चाफळहून रोज उंब्रज येथे स्नानाला जात होते. म्हणून येथे मारुतीची स्थापना झाली. माजलगावचा मारुती हा चाफळपासून दीड मैलाच्या अंतरावर आहे.
श्रीराम मंदिराच्या मागे सुमारे ३०० फूट अंतरावर चाफळ येथे प्रताप मारुतीचे मंदिर आहे. या मारुतीला ‘भीम मारुती’ किवा ‘वीर मारुती’ असेही म्हटले जाते. या मंदिराला ५० फूट उंच शिखर आहे. मूर्तीची उंची 7 ते 8 फूट आहे. ही मूर्ती ‘भीमरुपी महारुद्र’ या स्तोत्रात समर्थांनी वर्णन केल्याप्रमाणे या स्थितीत आहे. याव्यतिरिक्त कोल्हापूर जिल्ह्यातील मनपाडळे, पारगाव, सांगली जिल्ह्यातील शिराळे, बहे बोरगाव याठिकाणी 4 मारुती मंदिर आहेत.