
महाराष्ट्रातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत या उद्देशाने राज्य शासनाच्या क्रीडा विभागामार्फत एक सर्वसमावेशक आणि व्यापक धोरण राबविण्यात येत आहे. खेळाडूंना त्यांच्या क्रीडा कौशल्यात अधिक प्रावीण्य मिळावे, त्यांची क्षमता उंचावावी यासाठी तज्ज्ञ प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक तसेच आवश्यक पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिल्या जात आहेत. ‘मिशन ऑलिंपिक’च्या तयारीला क्रीडा विभागाने सुरुवात केली असून, गेल्या काही वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
नागपूर येथे धरमपेठ क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित पंच्याहत्तराव्या राज्य बास्केटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आणि विधानपरिषद सदस्य संदीप जोशी, आमदार विकास ठाकरे, अखिल भारतीय बास्केटबॉल संघटनेचे सचिव कुलविंदर गिल, तसेच राज्य बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव गोविंद मुथुकुमार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील क्रीडा क्षेत्राला नवी दिशा मिळावी, तसेच खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर आपली कला सादर करण्याची संधी मिळावी या हेतूने ‘खेलो इंडिया’ हे व्यापक अभियान सुरू केले. महाराष्ट्राने गेल्या काही वर्षांत क्रीडा क्षेत्रात केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना राज्यातील खेळाडूंनी यशाची जोड दिली असून, गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्र ‘खेलो इंडिया’मधील विविध स्पर्धांमध्ये अग्रस्थानी राहिला आहे.”
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, नागपूरमध्ये खेळाडूंना सक्षम सुविधा मिळाव्यात म्हणून विविध ठिकाणी आधुनिक क्रीडा केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. मानकापूर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य आणि आधुनिक क्रीडा संकुल उभारले जात असून, मोठ्या प्रमाणात विविध स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. सक्षम आणि गुणवंत खेळाडू घडविण्यासाठी आवश्यक सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यावर सरकारचा ठाम भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या आठ वर्षांत बास्केटबॉल क्षेत्रात संघटनांमधील राजकारणामुळे खेळाडूंना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र, या राजकारणाला दूर सारत खेळाडूंच्या हितासाठी आमदार संदीप जोशी यांनी महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. ते खेळाडूंसाठी अधिक तत्परतेने कार्य करतील आणि राज्यातील बास्केटबॉल क्षेत्र नव्या उंचीवर नेतील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.