राजभवनात नैसर्गिक शेती परिषद – पर्यावरण रक्षणासाठी नवा संकल्प
नैसर्गिक शेती ही निसर्गाच्या नियमांवर आधारित शेतीपद्धती असून ती हवामान बदलाच्या वाढत्या संकटावर प्रभावी उपाय ठरू शकते, असे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले. या पद्धतीमुळे पाण्याचा वापर पन्नास टक्क्यांनी कमी होतो, भूजलपातळी वाढते आणि उत्पादन खर्च घटतो. नैसर्गिक शेती केवळ शेतकऱ्यांसाठीच नव्हे तर पर्यावरण, आरोग्य, पाणी आणि माती या सर्व घटकांच्या रक्षणासाठी अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. राजभवन येथे आयोजित ‘नैसर्गिक शेती परिषदेत’ ते बोलत होते.
या परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्यासह अनेक खासदार, मंत्री आणि मान्यवर उपस्थित होते. राज्यपाल देवव्रत म्हणाले की, प्रारंभी रासायनिक शेती केली, मात्र कीटनाशकांच्या दुष्परिणामांमुळे त्यांनी ती पद्धत सोडली. विविध तज्ज्ञांशी चर्चा करून त्यांनी नैसर्गिक शेती अवलंबली आणि त्यातून अधिक चांगले उत्पन्न मिळाल्याचा अनुभव घेतला.
राज्यपालांनी स्पष्ट केले की, सध्याच्या शेतीचे तीन प्रकार आहेत – रासायनिक, जैविक आणि नैसर्गिक शेती. सेंद्रिय शेतीत उत्पादन काहीसे घटते, पण नैसर्गिक शेतीत उत्पादन कमी होत नाही, हे संशोधनातून सिद्ध झाले आहे. सेंद्रिय शेतीसाठी मोठ्या प्रमाणात शेणखत आणि गांडूळ खत आवश्यक असते, तर नैसर्गिक शेती निसर्गाच्या नियमांवर आधारित असल्याने त्यात कोणताही कृत्रिम हस्तक्षेप नसतो. जंगलात जसे झाडे कोणत्याही खताशिवाय जोमाने वाढतात, तशीच प्रक्रिया शेतीत लागू केली जाते.
ते पुढे म्हणाले की, नैसर्गिक शेती सर्व शेतांमध्ये राबवली, तर शेतातील पाणी जमिनीत मुरेल आणि त्यामुळे पूर व दुष्काळ या दोन्ही संकटांपासून बचाव होईल. जमिनीतील गांडूळ ही निसर्गाची अमूल्य देणगी असून ती जमिनीत छिद्रे करून ती हवेशीर बनवतात. एक गांडूळ आपल्या आयुष्यात पन्नास हजार नवीन गांडूळ निर्माण करते आणि जमिनीचा सेंद्रिय कार्बन वाढवते. अशा प्रकारे माती सुपीक बनते, पिके तंदुरुस्त राहतात आणि उत्पादन सातत्याने वाढते.
रासायनिक शेतीमुळे जमिनीची सुपिकता घटली, धान्यांचा स्वाद आणि पोषकता कमी झाली आहे. संशोधनानुसार गहू आणि भातातील पोषक घटक पंचेचाळीस टक्क्यांनी कमी झाले आहेत. त्यामुळे नैसर्गिक शेती हा केवळ पर्याय नाही, तर गरज बनली आहे. या पद्धतीमुळे देशी गाईंचे संवर्धन होते, शून्य खर्चात शेती शक्य होते आणि लोकांना आरोग्यदायी अन्न मिळते. पर्यावरण, माती आणि पाणी या तिन्हींचे संरक्षण करणारी ही शेतीच भविष्यासाठीचा खरा मार्ग असल्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी ठामपणे सांगितले.