जिल्हा युवा महोत्सवासाठी युवकांना ऑनलाइन नोंदणीचे आवाहन
युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जिल्हास्तरीय युवा महोत्सव 2025चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव 7 नोव्हेंबर रोजी पार पडणार असून, इच्छुक युवकांनी आपली नोंदणी 4 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी प्रा. मार्क धरमाई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
नोंदणीसाठी गुगल फॉर्मची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, युवकांनी https://forms.gle/Kmof5utKSuEqL3Pb9 या लिंकवर जाऊन आपली नोंदणी करावी. या महोत्सवाचे आयोजन युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या “विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” या उपक्रमांतर्गत करण्यात येत आहे. या उपक्रमाचा उद्देश युवकांच्या सर्जनशीलतेला आणि राष्ट्रभावनेला प्रोत्साहन देणे हा आहे.
राष्ट्रीय युवा महोत्सव 2025-26 अंतर्गत ‘विकसित भारत चॅलेंज ट्रॅक’चे राष्ट्रीय आयोजन 10 ते 12 जानेवारी 2026 या कालावधीत होणार आहे. त्यासाठी जिल्हास्तरीय निवड प्रक्रिया म्हणून या युवा महोत्सवातील विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये वक्तृत्व, कथा लेखन, चित्रकला, लोकनृत्य, लोकगीत, कविता लेखन आणि नवोपक्रम अशा विविध कलाप्रकारांचा समावेश आहे.
या स्पर्धांमध्ये पंधरा ते एकोणतीस वर्षे वयोगटातील युवक-युवतींना सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे. जिल्हास्तरावर निवड झालेल्या स्पर्धकांना पुढे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. यामुळे युवकांना आपली प्रतिभा सादर करण्याबरोबरच भारतीय संस्कृती, परंपरा आणि नवकल्पनांचा संगम साधता येईल.
स्पर्धांबाबतची सविस्तर माहिती www.dsomumbaicity.blogspot.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा युवा महोत्सवाचे स्पर्धा प्रमुख अनिल घुगे यांच्याशी 95943 69561 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.