माथेरानचे पर्यटन होणार अधिक सुलभ – ई-रिक्षा प्रकल्पाला वेग
माथेरान येथील पर्यटनविषयक पायाभूत सुविधा आणि पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी ई-रिक्षा सुरू करण्याची कार्यवाही गतीने करण्यात यावी, असे निर्देश पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. सर्वोच्च न्यायालयाने माथेरान येथे ई-रिक्षा सुरू करण्याबाबत दिलेल्या आदेशानुसार ही प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून पर्यटनवाढीस चालना द्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
सह्याद्री अतिथीगृह येथे माथेरान पर्यटनविषयक पायाभूत सुविधा आणि स्थानिक समस्यांबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्यासोबत आमदार महेंद्र थोरवे, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे, कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे, तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे सहभागी झाले होते.
बैठकीस माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, माथेरान शमिक रिक्षा चालकमालक संघटनेचे सचिव सुनिल शिंदे, माजी नगरसेवक शिवाजी शिंदे यांसह इतर संबंधित अधिकारीही उपस्थित होते. सर्वांनी एकत्रितपणे माथेरानच्या पर्यटन विकासासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा केली.
पर्यटनमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, “माथेरान हे राज्यातील एक अत्यंत लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. दरवर्षी येथे लाखो पर्यटक भेट देतात. त्यामुळे स्थानिक पायाभूत सुविधा, विशेषतः रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, तसेच पर्यावरणपूरक वाहतूक साधनांची उपलब्धता यावर विशेष भर देणे गरजेचे आहे. माथेरानमध्ये ई-रिक्षा सुरू झाल्यास पर्यावरणाचे संरक्षण होईल आणि स्थानिक रोजगारालाही चालना मिळेल,” असे ते म्हणाले.
यावेळी मंत्री शंभूराज देसाई यांनी महाराष्ट्र रस्ते विकास प्राधिकरणास निर्देश दिले की, वाहनतळासाठी आरक्षित असलेला भूखंड विनामोबदला माथेरान नगरपरिषदेकडे हस्तांतरित करण्यात यावा. तसेच त्या परिसरातील अतिक्रमणे तात्काळ हटवावीत. माथेरान पर्यावरण संवेदनशील सनियंत्रण समितीने नियमितपणे तसेच ऑफलाईन बैठका आयोजित करून सर्व कामकाजाचे समन्वयन करावे, अशाही सूचना त्यांनी दिल्या.