बेस्टच्या इलेक्ट्रिक बसगाड्या मुंबईकरांच्या सेवेत दाखल

मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत नवे युग सुरू झाले आहे. बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रम म्हणजेच ‘बेस्ट’च्या ताफ्यात आता पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक बस गाड्या दाखल झाल्या आहेत. भविष्यात ‘बेस्ट’चा संपूर्ण ताफा म्हणजेच शंभर टक्के बसगाड्या पर्यावरणपूरक असतील, असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कुलाबा येथील आगारात दीडशे नवीन इलेक्ट्रिक बसगाड्यांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मंत्री मंगल प्रभात लोढा, ॲड. आशिष शेलार, तसेच ‘बेस्ट’चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी पाच हजार बसगाड्या घेण्याचा निर्णय पूर्वीच झाला असून त्या टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मुंबई वन ॲपच्या माध्यमातून सर्व सार्वजनिक वाहतुकीसाठी एकाच तिकिटाची प्रणाली सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांकडून मिळणारे भाडे उत्पन्न वाढले, तर ‘बेस्ट’ आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम होईल, यासाठी व्यावसायिक दृष्टिकोनातून काम करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले. राज्य शासन आणि महानगरपालिका ‘बेस्ट’च्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांचीही माहिती दिली. कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीतील योगदान, कोविड काळातील लाभ निधीची रक्कम तसेच यावर्षी महानगरपालिका कर्मचाऱ्यांइतकाच बोनस देण्यात आला आहे. कर्मचारी आनंदी असतील, तर प्रवाशांना मिळणारी सेवा अधिक कार्यक्षम होईल, असे ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या लोकार्पण सोहळ्यात बोलताना सांगितले की, मुंबईकरांसाठी ‘बेस्ट’ आणि लोकल रेल्वे हे जीवनाचे अविभाज्य घटक आहेत. नागरिकांना सुखद आणि सुरक्षित प्रवास मिळावा यासाठी साडेतीन हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मुंबईच्या रस्त्यांवर आता पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक बसगाड्या धावणार आहेत, हा प्रवासाच्या नव्या पर्वाचा आरंभ आहे, असे त्यांनी नमूद केले.

एकनाथ शिंदे म्हणाले की, “मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर असून येथे देश-विदेशातील नागरिक मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे शहरातील सुविधा जागतिक दर्जाच्या व्हाव्यात यासाठी शासन प्रयत्नशील आहे. कोस्टल रोड, अटल सेतू, मेट्रो, काँक्रीट रस्ते आणि पूल या प्रकल्पांमुळे दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होत आहे.” सफाई कर्मचाऱ्यांना त्यांनी ‘मुंबईचे खरे हिरो’ संबोधले. त्यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी निधी उपलब्ध करून देणारी योजना लागू केल्याची माहितीही त्यांनी दिली.






1,645 वेळा पाहिलं