राज्यातील लोककलांच्या जतन व संवर्धनासाठी समिती स्थापन होणार
महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या लोककलांच्या जतन आणि संवर्धनासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याची सूचना नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. लोककला, लोकसंस्कृती आणि पारंपरिक कलांच्या विकासासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
विधानभवनात लोककलावंतांच्या समस्या, आव्हाने आणि त्यावरील उपाययोजना या विषयावर आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभिषण चवरे, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर, लोककला अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे, सुशांत शेलार, लोककलावंत नंदेश उमप, डॉ. भावार्थ देखणे आणि खंडूराज गायकवाड उपस्थित होते.
डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले की, “महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव विविध लोककलांमुळे अधिक समृद्ध झाले आहे. मात्र आधुनिक काळात या कलांना आवश्यक प्रोत्साहन आणि संरक्षण न मिळाल्याने त्या हळूहळू लोप पावत आहेत. त्यामुळे सांस्कृतिक कार्य विभागाने लोककलांसाठी स्वतंत्र समिती स्थापन करणे अत्यावश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या समितीमार्फत लोककलांचे संकलन, संहितीकरण आणि त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचे संग्रहालय उभारण्याचे काम करता येईल. तसेच विविध लोककला महोत्सव राज्यभरात व्यापक स्वरूपात आयोजित करून कलावंतांना व्यासपीठ मिळवून देण्याची जबाबदारीही ही समिती पार पाडू शकेल, असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद देत सांगितले की, लोककलावंतांच्या समस्या आणि त्यांच्या कलांच्या संवर्धनासाठी समितीची स्थापना लवकरच करण्यात येईल. शिक्षण विभागाशी समन्वय साधून लोककलेवरील प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन करण्यात येईल. तसेच लोककलावंतांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.