गडचिरोलीच्या दुर्गम भागात आरोग्यसेवेचा नवा आराखडा तयार
गडचिरोलीच्या दुर्गम आदिवासी भागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून आरोग्यसेवेचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि स्वयंसेवी सर्च संस्था यांच्या संयुक्त प्रयत्नातून आदिवासी भागात आरोग्यसेवेचा एक अभिनव नमुना उभा राहिला आहे. या पथदर्शी प्रकल्पांतर्गत आता जंगलातही मोबाईल आरोग्य केंद्रांद्वारे नागरिकांना थेट वैद्यकीय सेवा दिल्या जात आहेत.
राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने शासनाने अनेक नाविन्यपूर्ण योजना राबवल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात राबविण्यात येणारा हा उपक्रम राज्यातील दुर्गम भागांसाठी आदर्श ठरत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या संकल्पनेतून आरोग्यसेवा आता थेट जनतेच्या दारात पोहोचत असून, नागरिकांना गुणवत्तापूर्ण आणि मोफत उपचारांची हमी मिळत आहे.
धानोरा तालुका हा पूर्वी नक्षलग्रस्त आणि आरोग्यसेवेपासून वंचित मानला जाणारा भाग होता. या तालुक्यातील सत्तर गावांतील आदिवासी बांधवांना आता त्यांच्या घराच्या दारातच डॉक्टरांकडून तपासणी, औषधोपचार आणि आरोग्य मार्गदर्शन मिळत आहे. मोबाईल वैद्यकीय पथकांच्या माध्यमातून या भागात आरोग्य क्रांती घडत असून, नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि विश्वासाचे हास्य झळकताना दिसत आहे.
या उपक्रमात ‘सर्च’ संस्थेच्या आशा सेविकांचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे. धानोरा तालुक्यातील एकशे एक्याऐंशी आशा सेविकांना वर्षातून तीन वेळा तज्ज्ञांकडून प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे त्या अधिक आत्मविश्वासाने आणि कार्यक्षमतेने काम करत असून, स्थानिक आरोग्य सेवेत नवे बळ निर्माण झाले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत नुकताच झालेल्या अभिनव करारानुसार सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि आशा सेविका यांना एकत्रितपणे दोन दिवसांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. ही महाराष्ट्रातील पहिलीच क्रांतिकारी पद्धत ठरत असून, यामुळे गावपातळीवर आरोग्याच्या त्रिस्तरीय सेवा अधिक प्रभावीपणे राबवल्या जातील. भविष्यात आदिवासी संस्कृतीनुरूप आरोग्यसेवा विकसित करण्यावरही भर देण्यात येणार असून, गडचिरोलीत सुरू झालेली ही चळवळ म्हणजे खऱ्या अर्थाने आरोग्य क्रांतीची नवी पहाट ठरत आहे.