पंतप्रधान मोदींची आज गुजरात भेट – शाश्वत विकासाचा संकल्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून, या भेटीत ते केवडिया आणि एकता नगर परिसरातील अनेक विकासकामांना प्रारंभ करतील. गुरुवारी सायंकाळी ते वडोदरा येथे पोहोचून थेट केवडियाकडे रवाना होतील. संध्याकाळी पाच वाजून पंधरा मिनिटांनी ते ई-बसना हिरवा झेंडा दाखवतील आणि पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेला चालना देतील.

यानंतर संध्याकाळी साडेसहा वाजता पंतप्रधान एकता नगर येथे विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. या प्रकल्पांची एकूण किंमत एक हजार एकशे चाळीस कोटी रुपये इतकी असून, यात एकता द्वार ते नर्मदा मातेच्या पुतळ्यापर्यंतचा पदपथ, स्मार्ट बस बस स्टॉप , बोन्साय बाग, ई-बस चार्जिंग केंद्र, कौशल्या पथ, टाटा नर्मदा घाट विस्तार, नवीन निवासी इमारती, तसेच लिमडी तंबू नगरीसाठी प्रवेश मार्गयांचा समावेश आहे. हे प्रकल्प केवडिया परिसराला पर्यटन आणि विकासाच्या दृष्टीने नवीन ओळख देणार आहेत.

याच कार्यक्रमात पंतप्रधान मोदी सहाशे एक्याऐंशी कोटी रुपयांच्या नव्या प्रकल्पांची पायाभरणी करतील. या योजनांमध्ये सर्वात महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे ‘वीर बाल उद्यान’ हा नऊ कोटी रुपयांचा उपक्रम असून, मार्च 2026 पर्यंत पूर्ण होणार आहे. येथे भारताच्या विविध भागातील शौर्यवान बाल नायकांच्या प्रेरणादायी कथा दृश्य माध्यमांतून दाखवण्यात येणार आहेत.

31 ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला  स्टॅच्यू ऑफ युनिटीला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहतील. त्यानंतर राष्ट्रीय एकता दिनानिमित्त आयोजित परेडचे निरीक्षण करतील. या परेडमध्ये सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलिस दल, आयटीबीपी, एसएसबी, सीआयएसएफ अशा सोळा दलांच्या तुकड्या सहभागी होणार आहेत. परेडमध्ये शौर्यचक्र विजेते जवान, बीएसएफचे पदकप्राप्त अधिकारी आणि महिला तुकड्यांच्या रायफल ड्रिलचे आकर्षक सादरीकरणही होईल.

कार्यक्रमानंतर देशातील दहा राज्यांच्या झांकी देखील सादर केल्या जातील, ज्यामध्ये जम्मू-काश्मीर, महाराष्ट्र, मणिपूर, छत्तीसगड, अंदमान-निकोबार आदींचा समावेश आहे. भारतीय हवाई दलाचा फ्लायपास्ट, बीएसएफचा डॉग शो आणि आसाम पोलिसांचा मोटारसायकल स्टंट शो यामुळे कार्यक्रम अधिक आकर्षक होणार आहे. या भव्य सोहळ्यासाठी नऊ हजार पाहुणे उपस्थित राहणार असून, गुजरात पर्यटन विभागाने त्यांच्या सोयीसाठी अकरा अत्याधुनिक घुमट उभारले आहेत. त्यापैकी सात पाहुण्यांसाठी, दोन पोलिस कर्मचाऱ्यांसाठी आणि उर्वरित दोन जेवणासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

या भेटीद्वारे केवडिया परिसराला केवळ पर्यटनाचेच नव्हे तर सशक्त विकासाचेही नवीन केंद्रस्थान मिळणार असून, सरदार पटेलांच्या स्मृतीला आदरांजली वाहताना पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या एकतेचा संदेश पुन्हा अधोरेखित केला आहे.






9,055 वेळा पाहिलं