
रशियाने जगभरात खळबळ उडवणारी आण्विक शस्त्र चाचणी केली आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी जाहीर केले की, रशियाने “पोसिडॉन” नावाच्या अणुशक्तीवर चालणाऱ्या टॉरपीडोची यशस्वी चाचणी केली आहे. हे टॉरपीडो समुद्राच्या अतिशय खोल भागातून शत्रू देशांच्या किनाऱ्यांवर हल्ला करण्यास सक्षम आहे. पुतिन यांनी याला “रशियाच्या सागरी सामर्थ्याचा नवा अध्याय” असे संबोधले आहे.
ही चाचणी रशियाच्या उत्तर भागातील समुद्रात करण्यात आली. या वेळी अणुशक्तीवर चालणाऱ्या विशेष पाणबुडीमधून ‘पोसिडॉन’ सोडण्यात आले. हे शस्त्र हजारो किलोमीटर अंतर कापून लक्ष्य साधू शकते आणि कोणत्याही क्षेपणास्त्रविरोधी प्रणालीला चकवण्याची क्षमता त्यात असल्याचा दावा करण्यात आला आहे. पुतिन यांच्या म्हणण्यानुसार, हे शस्त्र गती, खोली आणि टिकाऊपणाच्या बाबतीत जगातील सर्व तंत्रज्ञानांपेक्षा प्रगत आहे.
या टॉरपीडोची सर्वात भयानक वैशिष्ट्य म्हणजे, स्फोट झाल्यानंतर समुद्राच्या तळातून निर्माण होणारी रेडिओधर्मी सूनामी. ही लाट शेकडो मीटर उंचीपर्यंत जाऊ शकते आणि किनाऱ्यावरील शहरे, बंदरे, तसेच लष्करी तळ काही क्षणांत नष्ट करू शकते. त्यामुळे शत्रू राष्ट्रांच्या किनारपट्ट्यांवर दीर्घकाळ विकिरणाचा परिणाम राहू शकतो, अशी माहिती लष्करी तज्ज्ञांनी दिली आहे.
पोसिडॉनला “सार्मत” या रशियाच्या सुप्रसिद्ध आंतरखंडीय क्षेपणास्त्रापेक्षा अधिक घातक मानले जात आहे. या दोन्ही शस्त्रांच्या माध्यमातून रशिया आपल्या संरक्षण आणि आक्रमण क्षमतेचा नवा स्तर गाठत आहे. पुतिन यांनी सांगितले की, या तंत्रज्ञानामुळे रशिया कोणत्याही अणु हल्ल्याला सामोरे जाण्यास तयार आहे आणि देशाची सुरक्षा अबाधित राहील.
या चाचणीनंतर जगभरात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिका, ब्रिटन आणि इतर पाश्चिमात्य देशांनी रशियाने केलेल्या या प्रयोगाकडे जागतिक शांततेसाठी गंभीर आव्हान म्हणून पाहिले आहे. लष्करी तज्ञांच्या मते, अशा अणुचाचण्या जगातील तणाव वाढवू शकतात आणि आण्विक शस्त्र नियंत्रणाच्या प्रयत्नांना धक्का पोहोचवू शकतात. त्यामुळे संयुक्त राष्ट्रांकडूनही या विषयावर लवकरच चर्चा होण्याची शक्यता आहे.