रशिया-भारत भागीदारी झाल्याने अमेरिकेची चिंता वाढली

रशिया आणि भारत यांच्यातील आर्थिक संबंध नव्या उंचीवर पोहोचले आहेत. अमेरिकेच्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवरही भारताने रशियाकडून तेल आणि सूर्यफूल तेल खरेदी वाढवून जागतिक बाजारात आपली ठाम भूमिका स्पष्ट केली आहे.

अमेरिका सध्या रशियावर कठोर आर्थिक निर्बंध लावत असून, रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे. त्यामध्ये भारताचं नाव अग्रक्रमाने घेतलं जात आहे. अमेरिकेचं म्हणणं आहे की, भारत रशियाकडून तेल खरेदी करून अप्रत्यक्षपणे रशियाला आर्थिक बळ देतो.

तथापि, भारताने स्पष्ट केलं आहे की त्याचे निर्णय पूर्णपणे राष्ट्रीय ऊर्जा सुरक्षेवर आधारित आहेत. रशियाकडून आयात केलेलं तेल भारतात रिफायनरी करून परदेशात विकलं जातं, ज्यातून देशाला मोठा आर्थिक फायदा होत आहे.

दरम्यान, रशियाने सूर्यफूल तेलाच्या निर्यातीत विक्रमी वाढ नोंदवली आहे. 2021 मध्ये भारताच्या सूर्यफूल तेल आयातीत रशियाचा वाटा फक्त दहा टक्के होता, जो 2024 मध्ये तब्बल दोन कोटी नऊ दशलक्ष टनांपर्यंत पोहोचला आहे म्हणजेच बारा पटीने वाढ झाली आहे.

रशिया-युक्रेन युद्धानंतर युक्रेनचं तेल युरोपमध्ये वळल्याने भारताने रशियाकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रशिया आता भारतासाठी एक विश्वासार्ह पुरवठादार म्हणून पुढे येत आहे.

अलीकडेच दोन्ही देशांच्या उद्योग प्रतिनिधींनी पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी बैठक घेतली असून, भविष्यातील व्यापार संबंध आणखी दृढ होण्याची चिन्हं दिसत आहेत.






18,483 वेळा पाहिलं