पूर्व ते पश्चिम मुंबईचा प्रवास होणार फक्त वीस मिनिटांत
मुंबईकरांचा मालाड ते ऐरोलीमधला वाहतूकीचा वेग आणखी वाढणार आहे. गोरेगाव-मुलुंड जोड मार्गासाठी दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात पाच पूर्णांक तीन किलोमीटर लांबीच्या जुळ्या बोगद्याचे काम वेगाने सुरू आहे. हा प्रकल्प मुंबईतील आतापर्यंतचा सर्वात मोठा बोगदा ठरणार आहे. यामुळे मुंबईकरांचा प्रवास सुकर होणार आहे.
मुंबईचा पश्चिम उपनगर भाग आणि पूर्व उपनगर भाग यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी सुरू असलेला प्रकल्प आता जलद गतीने पूर्ण केला जात आहे. २०२८ पर्यंत हा मार्ग प्रवाश्यांसाठी खुला होईल. हा मार्ग पश्चिमेकडील महामार्ग आणि पूर्वेकडील महामार्ग यांना जोडेल. सध्याचा प्रवास मार्ग अनेकदा वाहतूक कोंडीमुळे त्रासदायक ठरतो. या नवीन मार्गामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल.
या प्रकल्पातील खूप महत्त्वाचा भाग म्हणजे पाच पूर्णांक तीन किलोमीटर लांबीची तिहेरी मार्गिका असलेले दोन बोगदे आहेत. त्यांचे काम जोरात सुरु आहेत. या मार्गामुळे मालाडपासून ऐरोलीपर्यंतचा प्रवास अतिशय सोपा होईल. सध्या मालाड ते ऐरोली प्रवासासाठी अनेकदा दीड-दोन तासापेक्षा अधिक वेळ लागतो. हा वेळ वीस मिनिटांपर्यंत कमी होऊ शकतो. सिग्नल-मुक्त मार्गामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास अधीक सहज होईल. तसेच पश्चिम आणि पूर्व उपनगरांमध्ये थेट दुवा निर्माण झाल्याने या भागातील नागरिकांना दुसऱ्या भागात काम मिळण्याची संधी वाढेल. रोजगाराच्या संधी वाढतील. भविष्यात या मार्गामुळे ऐरोली परिसरातील वसाहती तसेच जागांना आणखी भाव येईल.
या प्रकल्पात अनेक आव्हानं आहेत. मात्र, यावर मात करत हा प्रकल्प २०२८ पर्यंत नागरिकांच्या सेवेत येईल. हा एक विकासात्मक प्रकल्प आहे, जो केवळ वाहतूकच सुधारणार नाही तर शहराच्या पूर्व-पश्चिम भागात अनेक बदल घडवून आणणार आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यावर मुंबईतील दैनंदिन प्रवासाचा अनुभव बदलणार आहे.