कॅनडाची कठोर पडताळणी – भारतीय विद्यार्थ्यांचे व्हिसा अर्ज फेटाळले

कॅनडाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी देण्यात येणा-या व्हिसावर कठोर निर्बंध लादल्यामुळे भारतीय अर्जदारांवर सर्वाधिक परिणाम झाला आहे. कधीकाळी जागतिक स्तरावर उच्च शिक्षण घेण्यासाठी पसंतीचे ठिकाण असलेल्या कॅनडाचे आकर्षण आता भारतीय विद्यार्थ्यांमध्ये कमी होत आहे.

कॅनडाच्या प्रशासकीय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०२५ मध्ये सुमारे चौ-याहत्तर टक्के भारतीय विद्यार्थ्यांचे अर्ज फेटाळण्यात आले. ऑगस्ट २०२३ मध्ये हा दर सुमारे बत्तीस टक्के इतका होता. याच महिन्यात, सर्व आंतरराष्ट्रीय अर्जदारांसाठी एकूण नकाराचा दर सुमारे चाळीस टक्के होता, तर चीनच्या अर्जदारांपैकी केवळ चोवीस टक्के अर्ज नाकारले गेले आहेत. अर्जदारांच्या संख्येतही मोठी घट झाली आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये वीस हजार नऊशे भारतीय विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. तर ऑगस्ट २०२५ मध्ये ही संख्या फक्त चार हजार पाचशे पंधरा वर आली.

कॅनडाने विद्यार्थ्यांच्या व्हिसाशी संबंधित फसवणूक रोखण्यासाठी कठोर नियम लागू केले असून तपासणी वाढवली आहे. २०२३ मध्ये, अधिकाऱ्यांनी सुमारे एक हजार पाचशे पन्नास विद्यार्थ्यांचे अर्ज रद्द केले. हे सर्व अर्ज बनावट स्वीकृती पत्रांशी जोडलेले होते. यापैकी बहुतेक अर्ज भारतातून आले होते. यानंतर, कॅनडाने पडताळणी उपाययोजनांचा विस्तार केला आहे आणि संभाव्य विद्यार्थ्यांसाठी आर्थिक आवश्यकता वाढवल्या आहेत. आता विद्यार्थ्यांना केवळ बँक स्टेटमेंट नव्हे, तर निधी कोठून आला याचा तपशीलवार पुरावा सादर करण्याची तयारी ठेवावी लागत आहे.

कॅनडाने तात्पुरत्या स्थलांतरितांची संख्या कमी करण्यासाठी सलग दुसऱ्या वर्षी विद्यार्थी व्हिसाची संख्या कमी केली आहे. भारतीय विद्यार्थ्यांची संख्या घटल्यामुळे कॅनेडियन शैक्षणिक संस्थांवरही परिणाम होत आहे. युनिव्हर्सिटी ऑफ वॉटरलूमध्ये गेल्या तीन-चार वर्षांत भारतीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशात दोन-तृतीयांश घट झाली आहे.

या वाढलेल्या नकार दरामुळे आणि स्थायी निवास तसेच नोकरीच्या संधींसाठी मार्ग कठीण झाल्यामुळे, भारतीय विद्यार्थी आता कॅनडामध्ये शिक्षण घेण्याच्या पर्यायाचा गंभीरपणे विचार करत आहेत. त्यामुळे या ठिकाणी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्यांही घटली आहे.






2,327 वेळा पाहिलं