कोकणातील पाच समुद्रकिनाऱ्यांसाठी वीस कोटींचा निधी मंजूर

महाराष्ट्र राज्य शासनाने कोकण किनारपट्टीवरील पाच समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या कामासाठी राज्य सरकारने वीस कोटी रुपये खर्च करण्याची योजना आखली आहे. या उपक्रमामुळे हे समुद्रकिनारे जागतिक पर्यटन नकाशावर झळकण्यास मदत होणार आहे. या निर्णयानंतर ब्लू फ्लॅग मानांकनाचे तेहत्तीस निकष पूर्ण करून पर्णका, श्रीवर्धन, नागाव, गुहागर आणि लाडघर हे किनारे जगातील सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्यांच्या यादीत समाविष्ट होतील. यामुळे महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर त्यांची नवी आणि आकर्षक ओळख निर्माण होईल.

कोकण किनारपट्टी महाराष्ट्राच्या पर्यटनाचा एक महत्त्वाचा आधार आहे, आणि या किनाऱ्यांची नैसर्गिक सुंदरता टिकवून त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयीसुविधांनी सुसज्ज करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. निवड झालेल्या पाचही किनाऱ्यांनी यापूर्वीच ब्लू फ्लॅग पायलट हा प्रायोगिक दर्जा मिळवलेला आहे. आता त्यांना कायमस्वरूपी आंतरराष्ट्रीय ब्लू फ्लॅग मानांकन मिळवून देण्यासाठी राज्य सरकार पूर्ण ताकदीने काम करत आहे.

राज्य शासनाने ब्लू फ्लॅग मानांकनाच्या निकषांनुसार आवश्यक असलेल्या सुविधा आणि पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी एकूण वीस कोटी रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. यापैकी सात कोटी रुपयांचा निधी पर्यटन संचालनालयाला तातडीने वितरित करण्यात आला आहे. या निधीचा उपयोग किनाऱ्यांवर जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी केला जाणार आहे, जेणेकरून पर्यटकांना सुरक्षित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक पर्यटनाचा अनुभव मिळेल.

ब्लू फ्लॅग हा एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित पर्यावरण पुरस्कार आहे, जो डेन्मार्क येथील फाऊंडेशन फॉर एन्व्हायरन्मेंटल एज्युकेशन या संस्थेद्वारे दिला जातो. हा पुरस्कार अशा समुद्रकिनाऱ्यांना दिला जातो जे तेहत्तीस कठोर निकषांवर यशस्वी ठरतात. या निकषांमध्ये प्रामुख्याने किनाऱ्यावर पर्यावरण शिक्षणाचे कार्यक्रम राबवणे, माहिती फलक लावणे, पाण्याची शुद्धता आणि स्वच्छता आंतरराष्ट्रीय मानकांनुसार राखणे, किनाऱ्याचे योग्य व्यवस्थापन, कचरा आणि प्लास्टिकचे योग्य विसर्जन करणे ,पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पुरेसे जीवरक्षक, प्रथमोपचार सुविधा, पिण्याचे पाणी, प्रसाधनगृहे, आणि चेंजिंग रूम्स यांसारख्या आवश्यक सुविधा उपलब्ध करणे, अशा अटींचा समावेश आहे.

ज्या किनाऱ्यांना हा दर्जा मिळतो, त्यांची गणना जगातील सर्वोत्तम आणि सर्वात सुरक्षित किनाऱ्यांमध्ये केली जाते. या समुद्र किनार-यांसाठी दिल्या गेलेल्या निधीतून या पाचही किनाऱ्यांवर आधुनिक प्रसाधनगृहे, पिण्याच्या पाण्याची सोय, चेंजिंग रूम्स, हिरकणी कक्ष आणि पार्किंग व्यवस्था उभारली जाईल. सोबतच सुरक्षिततेसाठी लाईफगार्ड टॉवर्स, प्रशिक्षित जीवरक्षकांची नेमणूक, सुरक्षित पोहण्याच्या जागा निश्चित करण्यात येईल. कचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक उपकरणे आणि डस्टबिन्स, सौर ऊर्जेवर आधारित पथदिवे लावण्यात येतील. या सर्व कामांची गुणवत्ता जपण्यासाठी थीम-आधारित स्थापत्यविशारद यांच्या मार्गदर्शनाखाली नामांकित कंत्राटदारांकडून ही कामे केली जाणार आहेत. ही कामे पुढील तीन वर्षांच्या कालावधीत पूर्ण करणे बंधनकारक आहे.

आता या किनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळेल, ज्यामुळे परदेशी पर्यटकांना आकर्षित करता येईल. किनाऱ्यांवरील नैसर्गिक सौंदर्य टिकून राहील. पर्यटन वाढल्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी वाढतील आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. पर्यटकांना अत्यंत स्वच्छ, सुरक्षित आणि सोयींनी युक्त किनाऱ्यांचा अनुभव घेता येईल. या मानकांचे पालन करण्यासाठी स्थानिक लोकांचा आणि ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे, ज्यामुळे किनाऱ्यांची मालकी आणि जबाबदारीची भावना वाढेल.






10,831 वेळा पाहिलं