पुण्यातील मेट्रोच्या नवीन उपमार्गिकांना सरकारची मंजुरी
पुणेकरांसाठी खुशखबर आहे. राज्य मंत्रीमंडळाने हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या दोन मेट्रो उपमार्गिकांना मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या मंत्रीमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत या मार्गिकांना मान्यता देण्यात आली.
पुणे मेट्रो टप्पा – दोन अंतर्गत खडकवासला-स्वारगेट -हडपसर- खराडी मेट्रो मार्गिकेअंतर्गत हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या दोन मेट्रो रेल्वे प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो ते सासवड रोड या दोन उपमार्गिका एकूण सोळा किलोमीटर लांबीच्या असून त्यामध्ये एकूण चौदा स्थानकांचा समावेश असेल. या दोन्ही उपमार्गिकांसाठी पाच हजार सातशे चार कोटी रुपये खर्च येणार असून या पूर्णत: उन्नत मेट्रो प्रकल्पांची महा मेट्रोमार्फत अंमलबजावणी करण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली. या दोन्ही प्रकल्पांमुळे पुणे शहरातील वाहतूक कोंडीपासून नागरिकांना दिलासा मिळेल.पुणे मेट्रो टप्पा-२ अंतर्गत होणा-या या दोन उपमार्गिकांमुळे हडपसर, फुरसुंगी, लोणी काळभोर आणि सासवडसारख्या वाढत्या उपनगरांना मेट्रो जोडणी मिळेल. या मेट्रोमुळे प्रवासाचा वेळ वाचेल आणि प्रदूषण कमी होण्यास मदत होईल
या प्रकल्पांमुळे पुणे शहराच्या पूर्वेकडील भागात मेट्रोचे जाळे विस्तारित होईल. प्रवाशांना जलद, सुरक्षित वाहतूक सुविधा उपलब्ध होईल आणि प्रवासाचा वेळ वाचेल. प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, या दोन उपमार्गिकांमुळे पूर्व पुणे आणि परिसरातील ग्रामीण भागातील लाखो प्रवाशांना लाभ मिळेल.