मढ – वर्सोवा दीड तासाचा प्रवास दहा मिनिटांत होणार
मुंबईत मढ ते वर्सोवा खाडीवर पूल उभारला जाणार आहे. या पुलामुळे मोठा वेळ वाचणार असून दीड-दोन तासांचा प्रवास हा फक्त दहा मिनिटांत होणार आहे.
या पुलाची लांबी ही साधारण दीड किलोमीटर आहे. पुलाचा अंदाजित खर्च तीन हजार नऊशे कोटी रुपये आहे. पुढील दोन महिन्यांत पुलाच्या कामाची सुरुवात केली जाणार आहे. रस्त्यामार्गे प्रवासाच्या वेळेत बचत करण्यासाठी मढ ते वर्सोवा असा खाडी पूल उभारला जाणार आहे. सध्या मालाडमधील मढ ते वर्सोवा हा एकवीस ते बावीस किमीचा प्रवास करण्यासाठी वाहनाने दीड तास लागतो. वाहतूक कोंडी झाल्यास हा वेळ आणखी वाढतो. हा पूल झाल्यास दीड तासाचं अंतर कमी होऊन प्रवास दहा मिनिटांवर येईल.
या पूलाचे काम सातत्याने खारफुटीच्या जोडीसाठी पर्यावरण आणि वन विभागाची आणि त्यानंतर उच्च न्यायालयाची मंजुरी यांमुळे लांबणीवर पडत होते. मुंबई महापालिकेने 2023 मध्ये खाडीवर पूल उभारणीचा निर्णय घेतला. फेब्रुवारी 2023 मध्ये महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथोरिटीकडून यासाठी हिरवा कंदील दाखवला. सीआरझेडकडूनही परवानगी मिळाली. कंत्राटदाराचीही नियुक्ती केली. पावसाळ्यासह तीन वर्षांच्या कालावधीत या पुलाची उभारणी केली जाणार आहे. या प्रकल्पात खारफुटीची झाडे तोडावी लागणार आहेत. मात्र त्यासाठीचा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्राच्या पर्यावरण आणि वन विभागाकडे पाठवण्यात आला नव्हता. जुलै 2025 मध्ये हा प्रस्ताव पाठवण्यात आला. आता दोन महिन्यांत या पुलाच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे.
या प्रकल्पाला मच्छिमारांकडून विरोध झाला. बोटीच्या मार्गातील अडथळे आणि बांधकामावेळी गाळ साचण्याची शक्यता यांमुळे मच्छिमारांनी प्रकल्पाला विरोध केला होता. मात्र प्रकल्पाचे महत्त्व सांगितल्यानंतर, हा विरोध मावळला.