पुणे महापालिकेचा कर्करुग्णांना दिलासा
पुणे महानगरपालिकेने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अभिनव प्रकल्प हाती घेतला आहे. पुणे महामालिका आता शहरातील कर्करुग्णांसाठी सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर कमी खर्चात पेट स्कॅन आणि प्रगत रेडिओ डायग्नोस्टिक केंद्र सुरू करणार आहे.
कर्करोगाचे निदान आणि उपचार आजच्या काळात अत्यंत महागडे झाले आहेत, ज्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांसाठी ते आवाक्याबाहेरचे झाले आहेत. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी पुणे महापालिकेने हा उपक्रम हाती घेतला आहे.
पुण्यात सध्या महापालिका किंवा कोणत्याही सरकारी रुग्णालयात पेट स्कॅनची सुविधा उपलब्ध नाही. पेट स्कॅन हे कर्करोगाच्या टप्प्याचे अचूक निदान करण्यासाठी, उपचारांचा प्रभाव तपासण्यासाठी आणि कर्करोग शरीरात कोठे पसरला आहे, हे पाहण्यासाठी अत्यंत आवश्यक असते. खासगी रुग्णालयांमध्ये या चाचणीसाठी लाखो रुपये खर्च येतो, ज्यामुळे अनेक गरीब रुग्णांना उपचारांअभावी किंवा उशिरा निदानामुळे जीव गमवावा लागतो.
या गंभीर आर्थिक ओझ्याला हलके करण्यासाठी पुणे मनपाने पुढाकार घेतला आहे. या प्रकल्पाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे, या सर्व सुविधा केंद्र सरकारच्या आरोग्य योजना दरांनुसार उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याचा अर्थ, खासगी दरांच्या तुलनेत या सुविधा रुग्णांना अत्यंत परवडणाऱ्या दरात मिळतील.
हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प तातडीने कार्यान्वित करण्यासाठी पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी प्रशासनाला निर्देश दिले आहेत. प्रकल्प अंमलात आणण्यासाठी सारसबागेजवळील कला दालन येथील सुमारे दहा हजार चौरस फुटांच्या प्रशस्त स्वतंत्र इमारतीची निवड करण्यात आली आहे. या रेडिओ डायग्नोस्टिक आणि पॅथॉलॉजी केंद्रात केवळ पेट स्कॅनच नव्हे, तर रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या इतर प्रमुख आणि महागड्या निदान सुविधाही उपलब्ध असतील. एमआरआय आणि सीटी स्कॅन, प्रगत पॅथॉलॉजी आणि बायोकेमिस्ट्री लॅब सेवा आणि इतर आवश्यक चाचण्या अत्यंत कमी दरात या ठिकाणी उपलब्ध असतील.
या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर, पुणे महानगरपालिका देशातील पहिली स्थानिक स्वराज्य संस्था ठरणार आहे, जी आपल्या हद्दीतील नागरिकांना पेट स्कॅनसारखी अत्याधुनिक आणि महागडी निदान सुविधा अत्यल्प दरात उपलब्ध करून देईल. हा निर्णय केवळ पुण्यातीलच नव्हे, तर जिल्ह्यातील आणि ग्रामीण भागातील गरीब कर्करुग्णांसाठीही जीवनदायी ठरणार आहे.