एसटीमध्ये महिला सुरक्षेसाठी आयपीएस अधिकाऱ्यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसमधील महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आता थेट आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. राज्य सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिली असून लवकरच आयपीएस अधिकारी एसटी महामंडळाच्या सुरक्षा विभागाचे प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारतील.

फेब्रुवारी महिन्यात पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात झालेल्या घटनेमुळे एसटी महामंडळाच्या सुरक्षेतील त्रुटी आणि निष्काळजीपणावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. त्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षेबाबत राज्य सरकारकडून ठोस पावले उचलण्याची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाने आयपीएस अधिकारी नियुक्त करण्याचा प्रस्ताव तयार करून सादर केला. मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाला हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे आता एसटी महामंडळाला अधिकृतपणे आयपीएस दर्जाचा अधिकारी मिळणार आहे.

या अधिकाऱ्याच्या नियंत्रणाखाली महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवरील सुरक्षा रचना, महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विशेष पथके, सीसीटीव्ही नियंत्रण प्रणाली आणि रात्रीच्या फेऱ्यांतील सुरक्षा तपासणी या सर्व बाबींवर देखरेख राहील. तसेच, शिस्त, आंतरिक तपासणी, कर्मचारी सुरक्षा प्रशिक्षण आणि प्रवासी तक्रार निवारण प्रणाली मजबूत करण्याची जबाबदारीही या अधिकाऱ्यावर असेल.

यामुळे प्रवाशांचा एसटीवरील विश्वास वाढेल. सुरक्षा पथकांची कार्यक्षमता व प्रतिसाद वेळ सुधारेल. महिला प्रवाशांच्या सुरक्षेबाबत तत्पर पावले उचलली जातील. कर्मचारी आणि चालक-वाहक यांच्यात शिस्तबद्धता वाढेल. गृहमंत्रालयाने संबंधित अधिकारी निवड प्रक्रिया सुरू केली आहे. लवकरच या पदावर नियुक्ती जाहीर होईल. राज्यातील सुमारे पंचवीस हजार बस आणि दोनशे पन्नास पेक्षा जास्त बसस्थानकांच्या सुरक्षेची जबाबदारी या नव्या सुरक्षा प्रमुखावर येणार आहे.

एसटी महामंडळात पहिल्यांदाच आयपीएस दर्जाचा अधिकारी येणार असून हा निर्णय प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षेसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.






7,666 वेळा पाहिलं