चक्रीवादळानंतर राज्यात पुन्हा पावसाचा इशारा
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची सतत हजेरी लागलेली असून, नोव्हेंबर महिना सुरु होऊनही पावसाचा जोर कायम आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने नवा इशारा दिला असून, पुढील तीन दिवस राज्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. विशेषतः पुणे, सांगली आणि सातारा या भागात ढगाळ वातावरण राहील आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.
यावर्षी मान्सूनदरम्यान सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली असून, शेतकरी अजूनही शासनाच्या मदतीची वाट पाहत आहेत. मोंथा चक्रीवादळानंतर आता आणखी एका चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला असून, त्यामुळे पावसाचा जोर काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात देशातील हवामानात मोठे बदल घडत आहेत. पश्चिमी विक्षोभ सक्रिय झाल्याने पाच ते आठ नोव्हेंबरदरम्यान उत्तराखंड, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये पाऊस आणि वादळांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे देशातील अनेक भागांत हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रातील रत्नागिरी, सांगली, सातारा, अहमदनगर, पुणे या भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच बीड, नांदेड, धाराशिव, सोलापूर, कोल्हापूर, परभणी, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांमध्येही ढगाळ वातावरण राहून विजांचा कडकडाट आणि हलका पाऊस होईल. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता असून, यादरम्यान वारेही वेगाने वाहतील, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे.
हवामान तज्ज्ञांच्या मते, पश्चिमी विक्षोभाचा सौम्य परिणाम उत्तर प्रदेशवर होऊ शकतो. जरी बहुतांश भागात मोठा पाऊस अपेक्षित नसला तरी मध्य व पश्चिम भारतात हवामानात स्पष्ट बदल दिसून येत आहे. विशेषतः पूर्व मध्य प्रदेश, कोकण आणि गोवा किनारपट्टी भागात पाच ते सहा नोव्हेंबरदरम्यान वादळ आणि पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.