
सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना शैक्षणिक संस्था, रुग्णालये, क्रीडा संकुले, बस डेपो आणि रेल्वे स्थानके या ठिकाणांहून भटक्या कुत्र्यांना हटवण्याची आदेश दिले आहे. तसेच, नसबंदी केल्यानंतरही अशा कुत्र्यांना पुन्हा त्याच ठिकाणी सोडता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
हा आदेश नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे होणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर देण्यात आला आहे. शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, बस स्थानके, रेल्वे स्टेशन अशा गर्दीच्या आणि सार्वजनिक महत्त्वाच्या ठिकाणांवरून भटक्या कुत्र्यांना तत्काळ हटवावे. कुत्र्यांची नसबंदी आणि लसीकरण केल्यानंतरही त्यांना परत या सार्वजनिक ठिकाणी सोडले जाऊ नये. गेल्या काही वर्षांपासून, विशेषतः लहान मुलांवर भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. रेबीज आणि गंभीर जखमांमुळे अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे किंवा ते कायमस्वरूपी जखमी झाले आहेत.
या गंभीर समस्येची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने एका सुओ मोटो याचिकेअंतर्गत स्वतःहून या प्रकरणाची सुनावणी सुरू केली. न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने यावर सखोल विचारमंथन केले. न्यायालयासमोर ज्येष्ठ वकील आणि न्यायमित्र म्हणून नेमलेल्या तज्ज्ञांनी या समस्येची भीषणता आणि राज्यांकडून होणारी अंमलबजावणीतील निष्क्रियता स्पष्ट केली.
राजधानी दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये भटक्या कुत्र्यांच्या चाव्याच्या हजारो घटना दरवर्षी नोंदवल्या जात आहेत, ज्यामुळे देशाच्या सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर, न्यायालयाने नागरिकांची सुरक्षितता आणि भीतीमुक्त वातावरण निर्माण करणे हे आपले प्राथमिक कर्तव्य मानून कठोर निर्देश देण्याचा निर्णय घेतला.
सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना या महत्त्वपूर्ण आदेशांचे तातडीने पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. या कुत्र्यांना नियुक्त निवारागृहांमध्येकिंवा आश्रयस्थानांमध्ये हलवावे. नसबंदी कार्यक्रमाच्या तरतुदीचा अर्थ या सार्वजनिक महत्त्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणांसाठी लागू होणार नाही. सर्व राज्यांनी व केंद्रशासित प्रदेशांनी दोन आठवड्यांच्या आत वरील सार्वजनिक ठिकाणांची यादीतयार करावी. त्यानंतर पुढील आठ आठवड्यांत, या सर्व जागांची कुंपण किंवा सीमा भिंतबांधून सुरक्षितता सुनिश्चित करावी, जेणेकरून भटक्या कुत्र्यांचा प्रवेश थांबेल.
याशिवाय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि इतर रस्ते मालकी संस्थांना राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवरून मोकाट गुरे आणि इतर जनावरे त्वरित हटवण्याचे निर्देश दिले आहेत. या जनावरांना गोशाळा किंवा निवारागृहांमध्ये हलवावे.