
भारतीय रेल्वेच्या पश्चिम मध्य रेल्वे विभागमधील कोटा प्रभागामध्ये वंदे भारत स्लीपर ट्रेनची ताशी एकशे ऐंशी किमी वेगाने धावली. या प्रवासादरम्यान लोको पायलटच्या डेस्कवरील पाणीदेखील सांडले नाही. ही पूर्णपणे स्वयंचलित ट्रेन आहे. त्यामुळे ही चाचणी यशस्वी ठरली आहे.
वंदे भारत स्लीपर ट्रेनची सवाई माधोपूर-कोटा-नागदा मार्गावर चाचणी घेण्यात येत आहे. सोळा डब्यांची ही ट्रेन ताशी एकशे ऐंशी किलोमीटर वेगाने चालवली जात आहे. याशिवाय आठशे टन रॅक लोड आणि अतिरिक्त एकशे आठ टन वजनासह या ट्रेनची चाचणी केली जात आहे. म्हणजे एकूण नऊशे आठ टन भार घेऊन ही स्लीपर ट्रेन ताशी एकशे ऐंशी किमी वेगाने धावली. स्वदेशी तंत्रज्ञानाने बनवलेल्या या ट्रेनच्या दोन ते सतरा नोव्हेंबर दरम्यान चाचण्या सुरू आहेत. या चाचण्यांचा उद्देश ट्रेनची तांत्रिक कार्यक्षमता, ब्रेकिंग, स्थिरता, कंपन आणि विद्युत प्रणाली तपासणे आहे. ही चाचणी लखनऊच्या भारतीय रेल्वेचे तांत्रिक सल्लागार आणि संशोधन केंद्राच्या मार्गदर्शनाखाली केली जात आहे.
वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या दुसऱ्या रेकने चाचणीदरम्यान हा यशस्वी वेग गाठला. ही नवीन सेमी-हाय-स्पीड ट्रेन बीईएमएलद्वारे आयसीएफ तंत्रज्ञान वापरून तयार करण्यात आली आहे. ती लांबच्या मार्गांसाठी डिझाईन केलेली आहे. संशोधन, डिझाईन आणि मानक संघटनाच्या चाचणी संचालनालयाचे पथक ही चाचणी करत आहे. सध्या सोळा कोचची ही रेक सवाई माधोपूर – कोटा – नागदा सेक्शनवर तपासली जात आहे. यापूर्वी ट्रेनची महोबा – खजुराहो सेक्शनवर चाचणी झाली होती. वंदे भारत स्लीपर ट्रेनची रेक नवीनतम डिझाइनच्या सुधारित बोगींनी सुसज्ज आहे, ज्यामुळे जास्त वेगानेही उत्कृष्ट स्थिरता आणि आराम मिळतो.