अभंग तुकाराम – गाथा संघर्षातून समाज परिवर्तन घडवणारी

मराठी चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा भक्ती, अध्यात्म आणि समाजपरिवर्तनाचा संगम अनुभवायला मिळाला तो म्हणजे दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘अभंग तुकाराम’. दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर आणि त्यांच्या अभंगांच्या गाथेवर आधारित असून तो केवळ धार्मिक चित्रपटच न राहता मानवी मूल्यांचा आणि श्रद्धेचा अनुभव देतो. या चित्रपटात योगेश सोमण यांनी संत तुकाराम महाराजांची भूमिका साकारली आहे तर स्मिता शेवाळे त्यांच्या पत्नी आवलीच्या भूमिकेत दिसते. अजय पूरकर एका विशेष भूमिकेत आहेत. ‘अभंग तुकाराम’ हा तुकाराम महाराजांच्या जीवनातील संघर्ष, भक्ती आणि समाजाशी असलेल्या नात्याचं प्रभावी चित्रण आहे. देहूच्या भूमीत उगवलेला एक साधा व्यापारी समाजातील अन्याय, जातीभेद आणि अंधश्रद्धांच्या विरोधात उभा राहतो आणि भक्तीमार्गावर आत्मशांती शोधतो हाच त्याच्या जीवनाचा खरा ‘अभंग’ ठरतो.

योगेश सोमण यांचा अभिनय या चित्रपटाचा आत्मा आहे. त्यांच्या डोळ्यांतील शांतता आणि आवाजातील भक्तीभाव तुकाराम महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाला जिवंत करतात. स्मिता शेवाळेची ‘आवली’ ही केवळ पत्नी नसून तुकारामांच्या भक्तीचा आरसा आहे. तिचा राग, वेदना आणि शेवटी झालेलं समाधान हे सर्व स्मिताने अत्यंत प्रभावीपणे अभिनयातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं आहे. या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील वारकरी संगीत आहे. तब्बल दहा अभंगांचा समावेश असलेल्या या चित्रपटात प्रत्येक अभंग प्रसंगानुसार गुंफला गेला आहे. वीणेचा नाद, पखवाजाचे ठोके आणि तबल्याचे सूर हा आध्यात्मिक क्षण प्रेक्षकांना वारीच्या भावविश्वात घेऊन जातो. संगीतकारांनी भक्तीभावाला आधुनिकतेचा स्पर्श देत एक हृदयस्पर्शी वातावरण तयार केलं आहे.

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी या चित्रपटात भक्ती आणि वास्तवाचा समतोल अप्रतिम राखला आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी, देहूतील जीवन, वारीचे दृश्य आणि तुकाराम महाराजांच्या समाधीचा प्रवास याचे छायाचित्रण अत्यंत मोहक आणि भावपूर्ण आहे. संवाद, वेशभूषा आणि दृश्यरचना या सर्व घटकांनी चित्रपटाला ऐतिहासिक सौंदर्य लाभले आहे. ‘अभंग तुकाराम’ पाहताना जाणवतं की हा केवळ धार्मिक चित्रपटच नाही तर मानवतेचा सण आहे. तुकाराम महाराजांचा “जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले” हा विचार आजही तितकाच लागू पडतो. भक्ती ही फक्त देवापर्यंत पोहोचण्याचं साधन नसून समाजपरिवर्तनाचं शस्त्र आहे असा संदेश या चित्रपटातून प्रभावीपणे उमटतो.

एकंदरीत ‘अभंग तुकाराम’ हा प्रेक्षकांना अंतर्मुख करणारा, विचार करायला लावणारा आणि मनात शांततेचा ओलावा निर्माण करणारा सिनेमा आहे. अभिनय, संगीत, दिग्दर्शन आणि संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा सुंदर मिलाफ या चित्रपटाला वेगळ्या उंचीवर नेतो. काही ठिकाणी गती मंदावली तरी भक्तीभाव आणि अभिनयाची खोली त्या त्रुटींवर मात करते. अभंग हे केवळ ओव्या नाही तर ते जिवंत अनुभव आहेत आणि त्या अनुभवांना पडद्यावर उतरवण्यात हा चित्रपट यशस्वी ठरतो. भक्ती, अभिनय आणि संदेश या तिन्ही स्तरांवर तो उत्कृष्ट ठरतो. त्यामुळे ‘अभंग तुकाराम’ चित्रपटाला पाच पैकी साडेचार गुण देत त्याला “मनाला शांती देणारी आणि विचारांना उजाळा देणारी” भव्यदिव्य कलाकृतीची विलक्षण कथा असं म्हणणं योग्य ठरेल.






2,107 वेळा पाहिलं