राज्यात कृषी समृद्धी योजनेतून शेती सक्षम आणि तंत्रज्ञानाधारित होणार

राज्यातील अनेक भागात जून ते सप्टेंबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पिकांचे, शेतीसंबंधित साधनसामग्रीचे आणि उत्पादनक्षम जमिनींचे नुकसान होऊन शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले. या परिस्थितीत शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेतीसाठी नवे साधनसंपन्न मार्ग खुले व्हावेत, यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विविध कृषी उपकरणे आणि सुविधा उभारण्यासाठी शासनाकडून अनुदान देण्यात येणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना ड्रोन, वैयक्तिक शेततळे, शेतकरी सुविधा केंद्र तसेच ट्रॅक्टर चालित रुंद सरी वरंबा यंत्र यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. या अनुषंगाने शासन निर्णय जारी करण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

या योजनेत एकूण चार प्रमुख घटकांचा समावेश करण्यात आला आहे — ट्रॅक्टर चालित रुंद सरी वरंबा यंत्र, वैयक्तिक शेततळे, शेतकरी सुविधा केंद्र उभारणी आणि मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन योजना. या माध्यमातून शेती अधिक वैज्ञानिक, कार्यक्षम आणि टिकाऊ करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

याशिवाय, कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गतही विविध शेती उपयोगी यंत्रसामग्री पुरवली जाणार आहे. त्याचबरोबर जैविक निविष्ठा निर्मिती केंद्र उभारणी, प्लास्टिक अस्तरीकरण, एकात्मिक कीड नियंत्रण, अन्नद्रव्य व्यवस्थापन, मृद परीक्षण प्रयोगशाळा उभारणी आणि शेतीसाठी ड्रोनचा वापर यांसारख्या अनेक उपक्रमांचा यात समावेश आहे.

शासनाच्या या निर्णयामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन पुन्हा उत्पादनक्षमतेकडे वाटचाल करता येणार आहे. या माध्यमातून राज्यातील शेतीक्षेत्र अधिक सक्षम, समृद्ध आणि तंत्रज्ञानाधारित होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.






8,530 वेळा पाहिलं