मुंबई पोलिसांना हक्काचं घर मिळणार
मुंबईतील ऐतिहासिक बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे स्वप्न आता दादर – नायगाव येथे मोठ्या प्रमाणावर साकार झाले आहे. नायगाव बीडीडी चाळीतील रहिवाशांना त्यांच्या नव्या, प्रशस्त घरांच्या चाव्या मिळण्याची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली आहे. पहिल्या टप्प्यात तयार झालेल्या पाच पुनर्वसित इमारतींमधील आठशे चौसष्ट रहिवासी कुटुंबांना लवकरच त्यांच्या पाचशे चौरस फुटांच्या घरांचा ताबा मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळ दिल्यानंतर पुढील आठवड्यात षण्मुखानंद सभागृहात आठशे चौसष्ट घरांच्या चावी वाटपाचा सोहळा आयोजित केला जाणार आहे.
मुंबई शहरातील वरळी, नायगाव, ना. म. जोशी मार्ग आणि शिवडी येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास हा देशातील सर्वात मोठ्या नागरी पुनरुत्थान प्रकल्पांपैकी एक आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात बांधलेल्या या चाळी आता जीर्ण झाल्या असून, चाळीतील रहिवासी अनेक वर्षांपासून अत्यंत लहान, एकशे साठ चौरस फुटांच्या खोल्यांमध्ये जीवन जगत आहेत. या रहिवाशांना आधुनिक सुविधांनी युक्त, सुरक्षित आणि प्रशस्त घरे मिळावीत यासाठी महाराष्ट्र सरकारने हा महत्त्वाकांक्षी पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
दादर – नायगाव येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास सुमारे सोळा एकर जागेवर होत आहे. नायगाव परिसरात एकूण बेचाळीस जुन्या चाळी आहेत, यामध्ये सुमारे तीन हजार तीनशे चव्वेचाळीस रहिवासी घरे आणि काही व्यावसायिक गाळे आहेत. वरळीप्रमाणेच नायगाव येथील पुनर्वसनातील प्रत्येक रहिवाशाला स्वतंत्र पार्किंग मिळावी, अशी येथील रहिवाशांची मागणी आहे. म्हाडा या मागणीचा सकारात्मक विचार करत असल्याचे समजते. या आठशे चौसष्ट घरांच्या वाटपामध्ये एक विशेष बाब आहे. यापैकी चारशे तेवीस घरे बीडीडी चाळीत राहणाऱ्या निवृत्त तसेच कार्यरत पोलिस कर्मचाऱ्यांसाठी राखीव आहेत. मुंबईत प्रथमच पोलिसांना इतक्या मोठ्या संख्येने आणि केवळ पंधरा लाख रुपये भरून पाचशे चौरस फुटांचे हक्काचे घर मिळणार आहे. म्हाडाने या घरांसाठीची पंधरा लाख रुपये रक्कम भरून घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे अनेक वर्षांपासून छोट्या घरात राहणाऱ्या पोलिस कुटुंबांचे गृहस्वप्न पूर्ण होणार आहे.