
मराठी चित्रपटसृष्टीत वास्तवाशी घट्ट नातं जोडणारे चित्रपट क्वचितच दिसतात पण ‘तीन पायांचा घोडा’ हा चित्रपट त्या प्रवाहातला एक संवेदनशील अपवाद ठरतो. दिनांक 7 नोव्हेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे सादर करते सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे आणि मुग्धा श्रीकांत देसाई हे असून कुणाल शुक्ला, रिया नलावडे आणि अविनाश लोंढे यांनी प्रभावी अभिनय केला आहे. त्यांच्या सोबत देविका दप्तरदार आणि गजानन परांजपे यांनीही आपल्या भूमिका उत्कृष्टरीत्या साकारल्या आहेत. नुपूर बोरा यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट २००० च्या दशकाच्या सुरुवातीच्या पुण्यात घडणाऱ्या एका भावस्पर्शी आणि अनोख्या मैत्रीची कथा सांगतो. जी नात्यांचा, स्वप्नांचा आणि बदलत्या काळाचा अर्थ नव्याने समजावते.
२००३ साल आहे. पुणे शहर अजूनही शांत आहे, ट्रॅफिक कमी आहे आणि लोक प्रत्यक्ष भेटून बोलतात. नोकिया फोन, कायनेटिक होंडा स्कूटर आणि चालणाऱ्या माणसांच्या आवाजांनी शहराच्या रस्त्यांवर एक वेगळंच संगीत घुमतं. या काळात तंत्रज्ञान आणि जीवनशैली दोन्ही बदलाच्या उंबरठ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर घडते अदनान, चंद्रिका आणि राठोड यांची कथा.
अदनान हा बारावीची परीक्षा वारंवार नापास होणारा मुलगा. त्याच्या आयुष्यात मोठं स्वप्न नाही, पण त्याच्या आजोबा म्हणजेच गजानन परांजपे यांचा त्याच्यावर प्रचंड विश्वास आहे. दुसरीकडे चंद्रिका ही एक महत्वाकांक्षी मुलगी आहे. अभिनय क्षेत्रात नाव कमावण्याचं तिचं स्वप्न आहे. अदनान आणि चंद्रिका यांचं नातं कोवळं आणि प्रामाणिक आहे पण आयुष्याच्या वास्तवात ते दोघं हरवतात.
त्याच वेळी त्यांच्या आयुष्यात प्रवेश करतो राठोड बनावट कागदपत्रं तयार करण्यात पटाईत, पण मनाने संवेदनशील मुलगा. चंद्रिका जेव्हा अदनानसाठी बनावट मार्कशीट मिळवण्यासाठी राठोडकडे जाते, तेव्हा एक वेगळीच मैत्री जन्म घेते. तिघे मिळून त्यांच्या लहानसहान साहसांचा आनंद घेतात, पण त्यांना कल्पनाही नसते की हाच प्रवास त्यांच्या आयुष्यात आणि शहरात एक मोठा बदल घडवून आणणार आहे.
चित्रपटाचं नाव “तीन पायांचा घोडा” हेच त्याचं योग्य शीर्षक आहे . जीवनात असंतुलन असलं तरी पुढे जाण्याची धडपड थांबत नाही. दिग्दर्शक नुपूर बोरा यांनी या संकल्पनेला अत्यंत संवेदनशीलतेने हाताळलं आहे. पात्रांची वाढ, नात्यांची गुंतागुंत आणि काळाचा बदल हे सर्व घटक इतक्या सहजतेने मांडले आहेत की प्रेक्षकांना स्वतःचं आयुष्य पडद्यावर उमटल्यासारखं वाटतं.
चित्रपटाचं छायाचित्रण आणि संगीत दोन्हीही भावनांना पूरक आहेत. जुन्या पुण्याचं वातावरण, गल्ल्या, स्कूटरचा आवाज आणि कॉल सेंटरच्या जगात पाऊल ठेवणारी तरुणाई. हे सगळं दृश्यरूपाने अनुभवताना प्रेक्षकही त्या काळात जातात. देविका दप्तरदार आणि गजानन परांजपे यांच्या भूमिका विशेष उल्लेखनीय आहेत. त्यांच्या अभिनयातून चित्रपटाला भावनिक खोली मिळते.
समीक्षकांनी या चित्रपटाला पाच पैकी साडेतीन गुण दिले आहेत. प्रेक्षकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावर “आजच्या पिढीचा आरसा” आणि “नात्यांचा अर्थ नव्याने उलगडणारा प्रवास” अशा प्रतिक्रिया दिसत आहेत.
एकूणच ‘तीन पायांचा घोडा’ हा केवळ एका काळाची कथाच नाही तर ती बदलत्या शहरातल्या तरुणांच्या भावविश्वाची त्यांच्या संघर्षाची आणि नात्यांच्या असंतुलनातून निर्माण होणाऱ्या संवेदनशील वास्तवाची जाणीव करून देणारी गोष्ट आहे. तरुणाईने हा चित्रपट नक्कीच एकदातरी अनुभवावा असा आहे.