
मुंबईहून कोलकाताकडे जाणाऱ्या स्पाइसजेटचे विमान एस जी सहाशे सत्तरचे एक इंजिन मध्यरात्री हवेत असताना अचानक निकामी झाले. वैमानिकांच्या अतुलनीय प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली आणि विमानाचे कोलकाता विमानतळावर सुरक्षित आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.
प्रवासादरम्यान वैमानिकांच्या लक्षात आले की, विमानाचे एक इंजिन काम करणे थांबवले आहे. त्यांनी कोणतीही वेळ न घालवता तातडीने कोलकाता एअर ट्रॅफिक कंट्रोलला याची माहिती दिली आणि पॅन-पॅन हा आपत्कालीन कोड घोषित करत लँडिंगची परवानगी मागितली.
कोलकाताच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर तातडीने पूर्ण आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली. अग्निशमन दले, रुग्णवाहिका आणि बचाव पथके धावपट्टीजवळ सज्ज ठेवण्यात आली. रात्री अकरा वाजून सदतीस मिनिटांनी वैमानिकांनी अत्यंत कौशल्याने एकाच कार्यरत इंजिनच्या मदतीने विमानाचे सुरक्षित लँडिंग केले. या थरारक घटनेत विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू सदस्य पूर्णपणे सुरक्षित आहेत. विमान कंपनीने या घटनेवर खेद व्यक्त केला असून, इंजिन निकामी होण्याचे नेमके कारण शोधण्यासाठी तांत्रिक तपासणी सुरू करण्यात आली आहे. विमानाचं आपत्कालीन लँडिंग होत असताना अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि बचाव पथकं सज्ज ठेवण्यात आली होती.