इराणची राजधानी तेहरानमध्ये भीषण पाणी संकट

इराणची राजधानी तेहरान सध्या भीषण पाणी संकटाचा सामना करत आहे. तेहरानमधील एक कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या महानगरासाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे मुख्य नैसर्गिक स्रोत पुढील फक्त दोन आठवड्यांत पूर्णपणे संपुष्टात येऊ शकतात, असा गंभीर इशारा तेहरान जल कंपनीचे संचालक बेहजाद पारसा यांनी दिला आहे. परिस्थितीची भयावहता इतकी आहे की, इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी थेट राजधानीचे शहर रिकामे करण्याची भीती व्यक्त केली आहे.

तेहरानला पाणी पुरवठा करणाऱ्या पाच मुख्य धरणांपैकी एक असलेल्या अमीर कबीर धरणामधील पाण्याची पातळी अत्यंत चिंताजनक झाली आहे. पारसा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या धरणात आता केवळ चौदा दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक आहे. ही क्षमता धरणाच्या एकूण क्षमतेच्या फक्त आठ टक्के इतकीच आहे. या तुलनेत, मागील वर्षी याच काळात धरणात शहाऐंशी दशलक्ष घनमीटर पाणी होते. मात्र, यंदा तेहरान प्रदेशात पावसाचे प्रमाण शंभर टक्क्यांनी घटले असल्याने हे संकट अधिक गडद झाले आहे.

इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियन यांनी देशासमोरच्या या संकटावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, पाण्याचे संकट आज चर्चा होत असलेल्या अंदाजापेक्षाही अधिक गंभीर आहे. त्यांनी इशारा दिला आहे की, नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पुरेसा पाऊस झाला नाही तर सरकारला पाण्याचे वाटप सुरू करावे लागेल. मात्र, डिसेंबरपर्यंत दुष्काळ कायम राहिला, तर तेहरान शहर रिकामे करण्याची वेळ येऊ शकते.

पाणीटंचाईचे हे संकट केवळ कमी पावसामुळे नाही, तर चुकीच्या जलव्यवस्थापनामुळे अधिक वाढले आहे. इराणमध्ये नव्वद टक्क्यांहून अधिक पाणी भात आणि गहू यांसारख्या जास्त पाणी लागणाऱ्या आणि जुन्या पीक पद्धतींमध्ये वापरले जाते. तेलाप्रमाणे भूजलाचा अत्यधिक उपसा आणि बेसुमार विंधन केल्यामुळे भूजल पातळी अत्यंत खाली गेली आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार आणि पाण्याची मागणी दुप्पट होऊनही पाणी व्यवस्थापनाच्या योजना वेळेत आखल्या गेल्या नाहीत.

या संकटावर मात करण्यासाठी सरकारने तात्पुरता उपाय म्हणून रात्रीच्या वेळी नळ बंद ठेवण्याची योजना सुरू केली असून, पाणी वाचवण्यासाठी शेजारील राष्ट्रांकडून पाणी मिळवण्याबाबत चर्चा सुरू केली आहे.






22,889 वेळा पाहिलं