कल्याण-कर्जत मार्गावर पूल बांधणार – दहा रेल्वे फाटक बंद करणार
मध्य रेल्वेने मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या हितासाठी आणि लोकलच्या वक्तशीरपणात सुधारणा करण्याच्या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने कल्याण ते कसारा-कर्जत मार्गावरील तब्बल हा फाटकं कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व दहा ठिकाणी आता दोनशे छत्तीस कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक आणि प्रशस्त रोड पूल बांधले जाणार आहेत. यामुळे मुंबई लोकलच्या प्रवासाचा वेळ तर वाचेलच, पण त्याचबरोबर रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतूक या दोघांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.
मध्य रेल्वेचा कल्याण ते कसारा-कर्जत हा विभाग मुंबई उपनगरीय नेटवर्कचा एक महत्त्वाचा भाग आहे. येथून दररोज हजारो चाकरमानी प्रवास करतात. या मार्गावर अनेक ठिकाणी रेल्वे फाटकं आहेत. जेव्हा एखादी लोकल किंवा लांब पल्ल्याची गाडी येते, तेव्हा सुरक्षेसाठी हे फाटकं बंद केले जातात. दिवसातून अनेक वेळा हे फाटकं उघडले आणि बंद केले जातात. प्रत्येक वेळी फाटक बंद असताना लोकल गाड्यांना सिग्नलसाठी थांबावे लागते, ज्यामुळे लोकलच्या वेळेत मोठा व्यत्यय येतो. रेल्वे फाटक बंद झाल्यावर दोन्ही बाजूंनी वाहनांची मोठी रांग लागते. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी ही कोंडी प्रचंड वाढते, ज्यामुळे रस्ते वाहतुकीचा वेळ मोठ्या प्रमाणात वाया जातो. स्थानिक नागरिकांना आणि प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. मध्य रेल्वेने याच समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढला आहे.
या दहाही ठिकाणी पूल बांधण्यासाठी रेल्वे प्रशासनाने दोनशे छत्तीस कोटी रुपयांचा महत्त्वपूर्ण निधी मंजूर केला आहे. या निधीचा वापर केवळ पूल बांधण्यासाठीच नव्हे, तर या प्रकल्पांशी संबंधित इतर तांत्रिक कामांसाठीही केला जाईल.
या निर्णयामुळे लोकल गाड्यांना थांबण्याची गरज भासणार नाही. रेल्वे मार्गावर कोणताही अडथळा नसल्यामुळे गाड्या त्यांच्या नियोजित वेळेत धावतील. प्रवाशांच्या वेळेची बचत होईल. ही फाटकं अपघातांसाठी संवेदनशील असतात. ते बंद केल्यामुळे रेल्वे रुळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांचा धोका पूर्णपणे टळेल. नवीन पूल बांधल्यामुळे रस्ते वाहतूक रेल्वे मार्गाच्या वरून सुरू राहील. यामुळे वाहनांना थांबण्याची गरज नसल्याने वाहतूक सुरळीत आणि जलद होईल. वाहतूक कोंडी कमी झाल्यामुळे गाड्यांचे इंजिन सुरू ठेवून उभे राहण्याचे प्रमाण कमी होईल, ज्यामुळे इंधनाची बचत होईल आणि वायू प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.
हा निर्णय केवळ लोकलच्या प्रवासाला वेग देणारा नाही, तर कल्याण-कसारा या पट्ट्यात राहणाऱ्या आणि दररोज रेल्वे फाटकामधून प्रवास करणाऱ्या हजारो स्थानिक नागरिकांसाठी दिलासादायक निर्णय आहे.