ठाणे – नवी मुंबईमध्ये स्वयंचलित टॅक्सी सेवा धावणार
मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक समस्या आणि नागरिकांच्या सुखकर प्रवासासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. मुंबईतील वांद्रे- कुर्ला व्यापारी संकुलाच्या धर्तीवर आता ठाणे, नवी मुंबई आणि मिरा- भाईंदर महापालिका क्षेत्रातही पॉड टॅक्सी सेवा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची अंमलबजावणी संस्था म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
पॉड टॅक्सी ही स्वयंचलित, लहान आणि कमी क्षमतेची वाहतूक व्यवस्था आहे, जी विशेष मार्गिकेवरून धावते. कमी जागा व्यापून जलद आणि वैयक्तिक वाहतुकीचा अनुभव देण्यासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरते. यापूर्वी सरकारने बीकेसीमध्ये पॉड टॅक्सी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आता याच धर्तीवर ठाणे, नवी मुंबई आणि मिरा- भाईंदर या तिन्ही महत्त्वपूर्ण शहरांमध्ये ही सेवा सुरू होणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प सार्वजनिक-खाजगी-भागीदारी तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. यामुळे प्रकल्पाच्या आर्थिक उभारणीसाठी खासगी गुंतवणूकदारांना संधी मिळणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या प्रकल्पाचा कोणताही आर्थिक भार संबंधित महापालिकांवर किंवा राज्य सरकारवर पडणार नाही.
ठाणे शहरात प्रस्तावित मेट्रो प्रकल्पापासून शहराच्या अन्य भागांमध्ये आणि मुख्य रस्त्यांवर ही पॉड टॅक्सी धावेल. ठाण्याची लोकसंख्या आणि वाढती वाहतूक कोंडी पाहता, पॉड टॅक्सी ही अत्यंत उपयुक्त ठरू शकते. प्रत्येक शहरात या प्रकल्पासाठी किमान पाच हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा मोठा खर्च खासगी कंपन्यांकडून उभारला जाईल. एमएमआरडीएने तिन्ही शहरांमधील प्रस्तावित पॉड टॅक्सी प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यासाठी एका सल्लागाराची नियुक्ती केली होती. या सल्लागाराने तिन्ही शहरांचे सर्वेक्षण करून त्याचा सविस्तर अहवाल नुकताच सादर केला आहे. या अहवालाच्या आधारावर आता पॉड टॅक्सी प्रकल्प राबविण्यास इच्छुक असलेल्या कंपन्यांना तिन्ही शहरांचे सर्वेक्षण करून त्यांचा स्वतंत्र अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआरडीएला कंपन्यांचे अहवाल आणि एमएमआरडीएने नियुक्त केलेल्या सल्लागाराच्या अहवालाचा अभ्यास करून आठवडाभरात पॉड टॅक्सीचा अंतिम आराखडा नगरविकास विभागास सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी याबद्दल अधिक माहिती देताना सांगितले की, पेट्रॉन कंपनीने यापूर्वी बडोदा येथे पॉड टॅक्सी प्रकल्प यशस्वीरित्या उभारला आहे. त्याच धर्तीवर ठाणे जिल्ह्यातील तीन महापालिकांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. सध्या तीन ते चार कंपन्या हा प्रकल्प उभारण्यास इच्छुक आहेत. पॉड टॅक्सी पूर्णपणे स्वयंचलित असल्याने आणि कमी जागेत उभारता येत असल्याने मुंबई महानगर क्षेत्रासाठी ती अधिक फायदेशीर ठरेल.
पॉड टॅक्सीमुळे मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानके, मेट्रो स्टेशन्स आणि व्यापारी संकुले यांना जोडणी मिळण्यास मदत होईल. यामुळे शहरातील अंतर्गत वाहतूक अधिक गतिमान, पर्यावरणपूरक आणि सुलभ होईल, ज्यामुळे नागरिकांच्या प्रवासाचा अनुभव पूर्णपणे बदलू शकतो.