आनंदाची बातमी ! पुण्यात लवकरच धावणार १००० ई-बस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने पीएम-ई ड्राईव्ह योजनेंतर्गत पुणे शहरासाठी एक हजार ई-बसेस खरेदीस मान्यता दिली आहे. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी या प्रस्तावावर अंतिम शिक्कामोर्तब केले असून, लवकरच या बसेस पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होईल आणि प्रदूषण नियंत्रणालाही मदत होईल, अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी सांगितले की, पुणे-पिंपरी चिंचवडचा वाढता विस्तार आणि लोकसंख्या लक्षात घेता पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या ताफ्यात किमान तीन हजार बस आवश्यक आहेत. त्यासाठी त्यांनी राज्य व केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या सहकार्यामुळे अखेर या प्रस्तावाला गती मिळाली आणि या प्रस्तावाला मान्यता मिळाली.
पुणे शहरात मेट्रोसह सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विकास हा सरकारचा प्राधान्यक्रम आहे. सध्या पुण्यात बत्तीस किमीवर मेट्रो सेवा सुरू असून, शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोही लवकरच सुरू होणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडला नव्या एक हजार ई-बसेस मिळाल्याने वाहतूक व्यवस्था अधिक भक्कम होईल आणि शहराचा शाश्वत विकास साधता येईल. नव्या एक हजार ई-बसच्या आगमनानिमित्त पुणेकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.