शासनाच्या सुधारणा मोहिमेतून औद्योगिक विकासाला नवी दिशा

समाजातील सर्वात शेवटच्या घटकापर्यंत विकासाच्या सुविधा पोहोचवून त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडविण्याची ताकद प्रशासनात आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. समाजकल्याणाचे ध्येय साध्य करण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेचा प्रभावी वापर करणे काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

वर्षा निवासस्थानी भारतीय प्रशासकीय सेवेतील 2024 च्या तुकडीतील आठ परिविक्षाधीन अधिकाऱ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, “महाराष्ट्र हे सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य असल्याने ग्रामीण आणि नागरी विकासावर लक्ष केंद्रित करणारे प्रशासन अत्यावश्यक आहे.” कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकाभिमुख, उत्तरदायी आणि कार्यक्षम प्रशासन उभारण्याचे आवाहनही त्यांनी केले.

राज्यात संतुलित औद्योगिक विकासासाठी शासनाने शंभर सुधारणा राबविण्याचा संकल्प केला असून, त्यासाठी विशेष ‘युद्धकक्ष’ कार्यान्वित करण्यात आली आहे. महसूल सुधारणा वेगाने करण्यासाठी सल्लागार नेमण्यापेक्षा अनुभवी अधिकाऱ्यांची समिती स्थापन केल्याचे त्यांनी सांगितले. याच अनुभवाच्या बळावर महसूल विभागातील अनेक प्रक्रिया साखळीप्रणालीत रुपांतरित होत असून त्या अधिक जलद आणि अचूक बनल्या आहेत.

औद्योगिक वापरासाठी अकृषक परवाना मिळण्याची प्रक्रिया शासनाने मोठ्या प्रमाणात सुलभ केली आहे. राज्यात गतीमान, पारदर्शक आणि उद्योगांना अनुकूल वातावरण निर्माण करण्यासाठी अनेक धोरणात्मक बदल केले जात आहेत. सर्व प्रशासकीय धोरणांचे पुनरावलोकन व पुनर्रचना करण्यासाठी शासनाने एकशे पन्नास दिवसांचा कार्यक्रम आखला असून, त्यातून व्यापक सुधारणा अमलात येत आहेत. मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक आदी भागांसह राज्यात नवे औद्योगिक पट्टे उभे राहत आहेत.

विदर्भातील नागपूर–अमरावती औद्योगिक पट्ट्यामुळे विकासाला नवे केंद्र मिळाले असून, अमरावती येथील ‘पीएम मित्रा पार्क’ आणि वस्त्रोद्योग पार्कमुळे संपूर्ण उद्योगपरिसंस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे नांदगाव पेठ औद्योगिक वसाहतीतील एकही भूखंड उपलब्ध राहिलेला नाही. अमरावती विमानतळ नागरी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असून, तेथे एअर इंडिया समूहातर्फे आशियातील सर्वात मोठे वैमानिक प्रशिक्षण केंद्र उभारले जात आहे. गडचिरोली जिल्ह्याचे ‘स्टील सिटी’मध्ये होणारे रूपांतर, मराठवाड्याला नवी दिशा देणारा शक्तीपीठ महामार्ग, तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये टोयोटा किर्लोस्करचा प्रकल्प उभारला जाणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.






12,356 वेळा पाहिलं