
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आणि अंबानी उद्योग समूहातील सदस्य तसेच ‘रोझी ब्लू फाऊंडेशन’च्या संचालक श्लोका अंबानी यांच्या सामाजिक सहकार्यातून नक्षलग्रस्त आणि दुर्गम गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या सौर ऊर्जीकरणाचा महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू झाला आहे. जिल्ह्यातील शैक्षणिक सुविधांना स्वच्छ आणि विश्वसनीय ऊर्जेचा आधार मिळावा, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘रोझी ब्लू फाऊंडेशन’ आणि त्यांच्या स्वयंसेवा व्यासपीठ ‘कनेक्ट फॉर’च्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. श्लोका अंबानी आणि सह-संस्थापक मानिती शाह यांनी गडचिरोली जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी अगोदरच केले होते. नीती आयोगाने ‘आकांक्षित जिल्हा’ म्हणून घोषित केलेल्या गडचिरोलीतील शैक्षणिक पायाभूत सुविधांच्या बळकटीसाठी श्लोका अंबानी यांनी घेतलेली पुढाकार अत्यंत प्रशंसनीय असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी 31 ऑक्टोबर 2025 रोजी ‘सोलर शाळा प्रकल्पा’अंतर्गत फाऊंडेशनला कामाची औपचारिक मंजुरी दिली. या निर्णयामुळे जिल्ह्यातील शैक्षणिक विकासाला नवीन दिशा मिळाली आहे. जिल्हा प्रशासन या प्रकल्पासाठी पूर्ण सहकार्य देईल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली.
पहिल्या टप्प्यात फाऊंडेशनने धानोरा तालुक्यातील दहा जिल्हा परिषद शाळांमध्ये सौर ऊर्जेवर आधारित युनिट्स बसविण्याचा उपक्रम सुरू केला आहे. यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानोरा, मुसक्या, सालेभट्टी, रांगी, निमगाव, दुडमला, मुरूमगाव, बन्धोना तसेच जिल्हा परिषद हायस्कूल धानोरा आणि मोहली या शाळांचा समावेश आहे. या सर्व शाळांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून अखंड वीज पुरवठा मिळणार आहे.
या उपक्रमामुळे अध्यापन, डिजिटल शिक्षण आणि इतर शैक्षणिक उपक्रम वीजपुरवठ्यावरील अनियमिततेपासून मुक्त होणार आहेत. या दहा शाळांमधील सुमारे एक हजार चारशे सत्तर विद्यार्थ्यांना या प्रकल्पाचा थेट लाभ मिळणार आहे. ‘सोलर शाळा’ उपक्रमामुळे गडचिरोलीतील शिक्षण क्षेत्राला स्वच्छ, टिकाऊ आणि विश्वासार्ह ऊर्जा पुरविणारा नवा आदर्श मिळत असून, दुर्गम भागातील शिक्षण व्यवस्थेला नवे बळ मिळणार आहे.