मुंबईकरांचा नव्या फौजदारी कायद्यांवरील प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद

आझाद मैदान येथे भारतीय न्यायसंहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय पुरावा कायदा या नव्या फौजदारी कायद्यांवर आधारित व्यापक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचा मुख्य आकर्षण म्हणजे पंचवीस मिनिटांच्या नाट्यप्रयोगातून नव्या कायद्यांची सोप्या आणि समजण्यासारख्या पद्धतीने दिलेली माहिती. नागरिकांकडून या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत असून प्रदर्शन स्थळावर दिवसभर उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. हे प्रदर्शन रविवार तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत सर्वांसाठी खुले आहे.

या प्रदर्शनात विविध न्यायप्रक्रियेचे प्रत्यक्ष दर्शन घडवणारी अनेक दालने उभारण्यात आली आहेत. मुख्य नियंत्रण कक्ष, पोलीस ठाणे, न्याय सहाय्यक प्रयोगशाळा संचालनालय, न्यायवैद्यक विभाग, अभियोग संचालनालय, नगर दिवाणी व सत्र न्यायालय, उच्च न्यायालय तसेच मध्यवर्ती कारागृह या विभागांचे वास्तवाभास निर्माण करणारे विभाग नागरिकांना पाहता येतात. नव्या कायद्यांनुसार आरोपीवर कशी कारवाई होते आणि न्यायालयीन प्रक्रिया कशी पार पडते, याचे प्रात्यक्षिक स्वरूपातील सादरीकरण विशेष आकर्षण ठरत आहे.

प्रदर्शनामध्ये नव्या कायद्यांतील प्रमुख कलमांचे विवरण आकर्षक रंगसंगती असलेल्या पोस्टर्समधून मांडण्यात आले आहे. नागरिकांना एखाद्या विशिष्ट कलमाचा अर्थ, त्यातील बदल आणि नागरिकांच्या दैनंदिन आयुष्यावर त्याचा होणारा परिणाम याबाबत सुलभ पद्धतीने माहिती मिळते. त्यामुळे कायद्यातील बदल अधिक स्पष्टपणे समजावेत, यासाठी करून घेतलेला हा उपक्रम प्रबोधनपर ठरत आहे.

प्रदर्शनाच्या आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे डिजिटल प्रश्नावलीची सुविधा. दोन मिनिटांच्या कालावधीतील दहा प्रश्नांची प्रश्नावली उत्तरून नागरिकांना आपल्या माहितीची चाचणी घेता येते. यामुळे सामान्य लोकांना नव्या कायद्यांबाबत तांत्रिक माहितीही सहज उपलब्ध होत आहे. तसेच प्रदर्शनाबाबत अभिप्राय नोंदवण्यासाठीही डिजिटल व्यवस्था ठेवण्यात आली आहे. याचबरोबर कारागृहांतील कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे विक्री स्टॉल्सही प्रदर्शनात आकर्षण ठरत आहेत.

गृह विभागाच्या वतीने नागरिकांना या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषत: विद्यार्थ्यांनी, विधि शाखेतील विद्यार्थ्यांनी आणि न्यायालयीन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांनी हे प्रदर्शन नक्की पाहावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. नवीन फौजदारी कायद्यांबाबत जनजागृती वाढविणारा हा उपक्रम माहितीपर, शैक्षणिक आणि सर्वांसाठी ज्ञानवर्धक ठरत आहे.






5,006 वेळा पाहिलं