डेन्मार्कमध्ये चारशे एक वर्ष जुनी टपालसेवा बंद

डेन्मार्क या देशाने नुकताच एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय घेत आपली चारशे एक वर्षांची टपाल सेवा अधिकृतपणे बंद केली आहे. ३० डिसेंबर २०२५ रोजी डेन्मार्कच्या सरकारी टपाल विभागाने आपले शेवटचे पत्र वितरित केले. या निर्णयामुळे पारंपारिक टपाल सेवा पूर्णपणे बंद करणारा डेन्मार्क हा जगातील पहिला देश ठरला आहे.

डेन्मार्कची टपाल सेवा १६२४ मध्ये राजा ख्रिश्चन चौथ्या यांच्या काळात सुरू झाली होती. चार शतकांहून अधिक काळ या सेवेने डेन्मार्कच्या जनजीवनात महत्त्वाची भूमिका बजावली. निळी आणि लाल रंगाची टपाल पेटी हे डेन्मार्कच्या रस्त्यांवरील एक अविभाज्य दृश्य होते. मात्र, काळाच्या ओघात आणि तंत्रज्ञानाच्या वेगामुळे ही परंपरा आता इतिहासजमा झाली आहे. डेन्मार्क हा जगातील सर्वाधिक डिजिटल देशांपैकी एक मानला जातो. टपाल सेवा बंद होण्यामागे डिजीटलायझेशन हे सर्वात मोठे कारण आहे. गेल्या पंचवीस वर्षांत डेन्मार्क मधील पत्रांच्या संख्येत नव्व्द टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. सन २००० मध्ये जिथे अब्जावधी पत्रे पाठवली जात होती, तिथे आता ती संख्या नगण्य झाली आहे. डेन्मार्क मधील नागरिक आता सरकारी संवाद, बिले आणि वैयक्तिक पत्रव्यवहारासाठी डिजिटल पोस्टबॉक्स आणि ई-मेलचा वापर करतात.

पोस्टनॉर्ड या सरकारी संस्थेने स्पष्ट केले की, पत्रांची संख्या अत्यंत कमी झाल्यामुळे टपाल सेवा चालवणे आता आर्थिकदृष्ट्या परवडणारे राहिलेले नाही. गेल्या वर्षी या विभागाला कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागला. त्यामुळे, पत्रांऐवजी आता केवळ पार्सल डिलिव्हरी आणि ई-कॉमर्स क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. संपूर्ण डेन्मार्कमधून सुमारे दीड हजार लाल रंगाच्या टपाल पेट्या काढून टाकण्यात आल्या आहेत. यातील काही पेट्यांचा लिलाव करून मिळालेला निधी समाजकार्यासाठी वापरला जाणार आहे. या निर्णयामुळे पोस्टनॉर्डमधील सुमारे दीड हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा आली आहे. सरकारी टपाल सेवा बंद झाली असली, तरी खाजगी कंपन्यांकडून नागरिक महागड्या दरात पत्रे पाठवू शकतील. मात्र, आता पूर्वीसारखी सरकारी खात्री आणि स्वस्त दर मिळणार नाहीत. या बदलाची नोंद म्हणून डेन्मार्कच्या प्रसिद्ध अभिनेत्री एलेन हिलिंग्सो यांनी पोस्टनॉर्डच्या वतीने जनतेला उद्देशून एक शेवटचे पत्र वाचून दाखवले. अनेक ज्येष्ठ नागरिकांनी या निर्णयावर हळहळ व्यक्त केली आहे, कारण पत्रांमध्ये असलेली माया आणि ओलावा डिजिटल संदेशांमध्ये नसतो, अशी त्यांची भावना आहे.






21,540 वेळा पाहिलं