
भारतीय कृषी क्षेत्राने जागतिक स्तरावर एक मोठी झेप घेतली असून, तांदूळ उत्पादनात भारताने जगातील प्रथम क्रमांक पटकावला आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी माहिती दिली की, २०24 – २०२५ या वर्षात भारताने तांदूळ उत्पादनात चीनला मागे टाकले आहे. या यशामुळे भारतीय शेतीची जागतिक ओळख अधिक प्रभावी झाली असून देशाची अन्नसुरक्षा व्यवस्था अत्यंत भक्कम झाली आहे.
या विक्रमी कामगिरीमध्ये भारताचे एकूण तांदूळ उत्पादन एकशे पन्नास पूर्णांक अठरा दशांश दशलक्ष टन इतके झाले आहे. याउलट, चीनचे उत्पादन एकशे पंचेचाळीस पूर्णांक अठ्ठावीस दशांश दशलक्ष टन इतके नोंदवले गेले आहे. जगातील एकूण तांदूळ उत्पादनाच्या भारताचे तांदूळ उत्पादन हे सुमारे अठ्ठावीस टक्के इतके जास्त आहे. या बदलामुळे जागतिक अन्न साखळीमध्ये भारताचे महत्त्व लक्षणीयरीत्या वाढले आहे, अशी माहितीही केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे.
हे अभूतपूर्व यश मुख्यतः प्रगत आणि अधिक उत्पन्न देणाऱ्या बियाण्यांच्या वापरामुळे शक्य झाले आहे. केंद्र सरकारने भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या मदतीने पंचवीस पिकांसाठी एकशे चौऱ्यांशी नवीन सुधारित वाणांची घोषणा केली आहे. या आधुनिक बियाण्यांमुळे केवळ उत्पादनच वाढले नाही, तर शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नातही मोठी वाढ होण्यास मदत होत आहे. ही नवीन बी-बियाणे भारतीय हवामानाला पूरक असल्याने त्याचा मोठा फायदा उत्पादनात झाला आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या या उत्पादनामुळे यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमानही उंचावण्यास मदत होणार आहे.
देशात तांदळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे आता साठा मुबलक झाला आहे. आपली देशांतर्गत गरज पूर्ण करून उरलेला अतिरिक्त तांदूळ आता परदेशी बाजारपेठेत निर्यात करण्यासाठी उपलब्ध आहे. यामुळे देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळणार असून, भारत आता जागतिक अन्नपुरवठ्यात एक विश्वासार्ह भागीदार म्हणून पुढे आला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यात कृषी क्षेत्राचा हा वाटा अत्यंत मोलाचा ठरत आहे.
कृषी क्षेत्रातील या यशानंतर सरकारने आता डाळी आणि तेलबियांच्या उत्पादनावर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे. देशातील कृषी संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान आणि सिंचन सुविधांच्या जोरावर हे यश टिकवून ठेवण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे. यामुळे भविष्यात शेतीमध्ये विविधता येईल आणि शेतकऱ्यांचे आयुष्य अधिक स्थिर, समृद्ध आणि सुदृढ होईल, असा विश्वास कृषी मंत्र्यांनी व्यक्त केला आहे.