जपानमध्ये शक्तिशाली भूकंप – जनजीवन विस्कळीत

जपानच्या पश्चिम किनारपट्टीवरील शिमने प्रांतात मंगळवारी सकाळी सहा पूर्णांक दोन रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. जपानच्या हवामान खात्यानुसार, या भूकंपानंतर त्सुनामीचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. मात्र, या धक्क्यांमुळे पश्चिम जपानमधील जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक भागांत पडझडीच्या घटना घडल्या आहेत.

मंगळवारी सकाळी स्थानिक वेळेनुसार दहा वाजून अठरा मिनिटांनी हा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू पूर्व शिमने प्रांतात जमिनीखाली अवघ्या दहा किलोमीटर खोलीवर होता. या शक्तिशाली धक्क्यापाठोपाठ परिसरात बाराहून अधिक लहान-मोठे धक्के जाणवले. यामध्ये रिश्टर स्केलवर पाच पूर्णांक एक आणि पाच पूर्णांक चार तीव्रतेच्या धक्क्यांचाही समावेश होता. भूकंपामुळे किमान चा लोक जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्सुए आणि यासुगी शहरांमधील काही जुन्या इमारतींच्या भिंतींना तडे गेले असून वीजवाहिन्या तुटल्याच्या बातम्या आहेत. भूकंपाच्या धक्क्यांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने जेआर वेस्ट कंपनीने सान्यो शिंकानसेन या बुलेट ट्रेनची सेवा हिरोशिमा आणि ओकायामा दरम्यान काही काळासाठी स्थगित केली होती. दुपारी एक वाजेनंतर ही सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. शिमने प्रांतात चुगोकु इलेक्ट्रिक पॉवर कंपनीचा अणुऊर्जा प्रकल्प आहे. भूकंपानंतर मुख्य कॅबिनेट सचिव मिनोरू किहारा यांनी माहिती दिली की, या प्रकल्पाच्या कोणत्याही युनिटमध्ये कोणतीही अनियमितता किंवा हानी आढळलेली नाही. सर्व प्रकल्प सुरक्षित असून त्यांचे कामकाज सामान्यपणे सुरू आहे.

जपानच्या सागरी स्वसंरक्षण दलाने बाधित क्षेत्रांचे हवाई सर्वेक्षण करून नुकसानीचा अंदाज घेण्याचे काम सुरू केले आहे. पंतप्रधान साने टाकाईची यांनी नागरिकांना पुढील काही दिवस सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे, कारण आगामी आठवड्यात अशाच तीव्रतेचे आणखी धक्के बसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सुदैवाने त्सुनामीचा धोका नसल्याने मोठी जीवितहानी टळली असली, तरी प्रशासनाने स्थानिकांना आपत्कालीन साहित्यासह सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.






20,236 वेळा पाहिलं