उत्तर भारतात दाट धुके – बर्फवृष्टीचा विमान सेवेला फटका

उत्तर भारतात सध्या कडाक्याच्या थंडीसोबतच दाट धुक्याची चादर पसरली आहे, तर डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होत आहे. याचा थेट परिणाम विमान उड्डाणांवर झाला असून, आज देशभरातील शेकडो उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत किंवा त्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून विमान कंपन्यांनी प्रवाशांना विमानतळावर येण्यापूर्वी आपली विमानाची सद्यस्थिती तपासून पाहण्याचे आवाहन केले आहे.

देशातील सर्वात मोठ्या विमान कंपनीने, इंडिगोने सोशल मीडियाद्वारे प्रवाशांना कळवले आहे की, दिल्ली, वाराणसी आणि अमृतसर सारख्या शहरांमध्ये दृश्यमानता अत्यंत कमी असल्यामुळे विमानांच्या वेळापत्रकात बदल झाला आहे. कंपनीने प्रवाशांना त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेली फ्लाईट ट्रॅकर सुविधा वापरण्याचा सल्ला दिला आहे. एअर इंडियाने आपल्या धुक्याशी संबंधित धोरणाचा उल्लेख करत प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या प्रवाशांची उड्डाणे धुक्यामुळे रद्द झाली आहेत किंवा त्यांना विलंब झाला आहे, त्यांना विनाशुल्क तिकीट रद्द करण्याची किंवा पुनर्नियोजित करण्याची परवानगी देण्यात आली आहे. स्पाइसजेटने देखील दिल्ली आणि श्रीनगर विमानतळावरील खराब हवामानाचा संदर्भ देत प्रवाशांना सावध केले आहे. धुक्यामुळे विमानांचे लँडिंग आणि टेक-ऑफ करणे धोकादायक असल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून अनेक फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत.

दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर कॅट तीन ही प्रगत लँडिंग प्रणाली कार्यान्वित असूनही, दृश्यमानता पन्नास मीटरपेक्षा कमी झाल्यामुळे अनेक विमानांचे मार्ग वळवण्यात आले आहेत. काश्मीर खोऱ्यात होत असलेल्या मुसळधार बर्फवृष्टीमुळे श्रीनगर विमानतळावरील धावपट्टी बर्फाने झाकली गेली आहे, परिणामी तिथली सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहेत. विमान कंपन्यांनी प्रवाशांना घराबाहेर पडण्यापूर्वी एअरलाईन्सच्या ॲप किंवा वेबसाइटवर विमानाची स्थिती तपासा, एसएमएस आणि ई-मेलवर येणाऱ्या सूचनांकडे लक्ष द्या, विमानतळावर पोहोचण्यास विलंब होऊ शकतो, त्यामुळे प्रवासाचे नियोजन वेळेआधी करा, अशा सूचना दिल्या आहेत. धुक्यामुळे दरवर्षी विमान वाहतूक विस्कळीत होते, मात्र यंदा बर्फवृष्टी आणि धुक्याचा दुहेरी फटका बसल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. यामुळे हजारो प्रवाशांना विमानतळावर ताटकळत राहावे लागत आहे.






20,536 वेळा पाहिलं