
राज्यातील आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केलेल्या, प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत.
निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीतील सर्वात महत्त्वाची आणि तांत्रिक प्रक्रिया आहे. मतदान यंत्रांची हाताळणी, मतदानाची नोंदणी, केंद्रांवरील सुरक्षा आणि मतमोजणी या सर्व बाबींसाठी कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाते. जर कर्मचारी या प्रशिक्षणाला गैरहजर राहिले, तर प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मोठ्या चुका होण्याची शक्यता असते, यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊ शकतो. हीच बाब लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने गैरहजर कर्मचाऱ्यांची गंभीर दखल घेतली आहे.
निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, ज्या कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणाला दांडी मारली आहे, त्यांच्यावर केवळ शिस्तभंगच नाही तर लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले जाऊ शकतात. यामध्ये निलंबनापासून ते दंडात्मक कारवाईपर्यंतच्या तरतुदींचा समावेश आहे. जे अधिकारी किंवा कर्मचारी वैद्यकीय किंवा इतर अनिवार्य कारणांशिवाय गैरहजर राहिले आहेत, त्यांची यादी तयार करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. केवळ गंभीर आजार किंवा अपरिहार्य कौटुंबिक आपत्ती असेल तरच अशा कर्मचाऱ्यांना माफी मिळण्याची शक्यता आहे, अन्यथा त्यांच्यावर थेट कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. काही प्रकरणांमध्ये, ज्यांनी पहिले प्रशिक्षण चुकवले आहे, त्यांना शेवटची संधी म्हणून पुनर्प्रशिक्षणासाठी बोलावले जात आहे. मात्र, या संधीचाही लाभ न घेणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मीरा-भाईंदर यांसारख्या मोठ्या महानगरपालिकांमध्ये निवडणुकीची तयारी सुरू असताना, तेथील आयुक्तांना आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना अशा कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्याचे आणि अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
निवडणूक आयोगाच्या या कडक पवित्र्यामुळे कर्मचारी वर्गात खळबळ उडाली आहे. अनेकदा निवडणुकीचे काम टाळण्यासाठी कर्मचारी विविध कारणे पुढे करून रजेवर जातात किंवा प्रशिक्षणाकडे पाठ फिरवतात. मात्र, शिस्तभंग आणि फौजदारी कारवाई या शब्दांमुळे आता कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मोठी वाढ होण्याची चिन्हे आहेत.