समृद्धी महामार्गावर पाच दिवसांसाठी टप्प्याटप्प्याने वाहतूक बंद

समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. महामार्गावर आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित महामार्ग वाहतूक व्यवस्थापन प्रणाली अंतर्गत मोठे लोखंडी खांब उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी नऊ जानेवारी ते तेरा जानेवारी या पाच दिवसांच्या कालावधीत महामार्गावर टप्प्याटप्प्याने वाहतूक बंद ठेवली जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ या महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि वेग मर्यादेवर लक्ष ठेवण्यासाठी हाय-टेक यंत्रणा बसवत आहे. यासाठी महामार्गाच्या दोन्ही वाहिन्यांवर मोठमोठ्या लोखंडी गॅन्ट्री बसवल्या जाणार आहेत. या गॅन्ट्रीवर सीसीटीव्ही कॅमेरे, सेन्सर्स आणि माहिती देणारे डिजिटल बोर्ड लावले जातील. हे काम अवजड यंत्रसामग्रीच्या सहाय्याने केले जात असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव काही काळ वाहतूक थांबवणे अनिवार्य आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, हे काम एकूण दहा टप्प्यांत पूर्ण केले जाणार आहे. प्रत्येक टप्प्यात संबंधित वाहिनीवरील वाहतूक साधारण पंचेचाळीस मिनिटे ते एक तास पूर्णपणे बंद ठेवली जाईल. प्रामुख्याने अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर या तालुक्यांमधून जाणाऱ्या महामार्गाच्या टप्प्यावर हा ब्लॉक घेतला जाईल.

महामार्ग पूर्णपणे पाच दिवस बंद नसेल, तर दिवसातील ठराविक वेळेत खासकरुन दुपारी फक्त एक तासासाठी वाहतूक थांबवली जाईल. नागपूरकडून मुंबईकडे जाणारी आणि मुंबईकडून नागपूरकडे जाणारी अशा दोन्ही वाहिन्यांवर वेगवेगळ्या दिवशी हा परिणाम जाणवेल. गॅन्ट्री उभारण्याचे काम पूर्ण होताच, अडवून धरलेली वाहतूक तात्काळ पुन्हा सोडण्यात येईल. तुम्ही या तारखांच्या दरम्यान समृद्धी महामार्गावरून प्रवास करणार असाल, तर प्रवासाच्या वेळेत एक तासाचा अतिरिक्त वेळ धरूनच घराबाहेर पडावे. आपत्कालीन प्रवासासाठी प्रवासी जुन्या महामार्गाचा किंवा स्थानिक रस्त्यांचा वापर करू शकतात, मात्र महामार्गावरील ब्लॉक फक्त काही मिनिटांचा असल्याने तिथे थांबणे सोयीचे ठरेल. ब्लॉकच्या ठिकाणी तैनात असलेल्या पोलीस आणि सुरक्षा रक्षकांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

ही गॅन्ट्री यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर समृद्धी महामार्गावरील प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे. ओव्हरस्पीडिंग करणाऱ्या वाहनांवर आपोआप कारवाई होईल. अपघात झाल्यास त्याची माहिती नियंत्रण कक्षाला त्वरित मिळेल. महामार्गावर पुढे काही अडथळा किंवा पाऊस असल्यास डिजिटल बोर्डवरून सूचना मिळतील.






21,292 वेळा पाहिलं