अलिबागची हवेची गुणवत्ता घसरली – पर्यटनावर परिणाम होण्याची शक्यता
अलिबाग हे मुंबई आणि पुण्याजवळचे सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. स्वच्छ समुद्रकिनारे आणि प्रसन्न वातावरण यासाठी ओळखल्या जाणाऱ्या या शहराला आता प्रदूषणाने ग्रासले आहे. गेल्या काही दिवसांपासून अलिबागच्या हवेचा दर्जा कमालीचा घसरला असून येथील प्रदूषणाची पातळी वाढली आहे. सफर या हवेची गुणवत्ता मोजणाऱ्या संस्थेच्या आकडेवारीनुसार, अलिबागचा हवेचा दर्जा निर्देशांक दोनशे च्या पार गेला असून तो वाईट श्रेणीत नोंदवला गेला आहे.
अलिबागमध्ये अचानक वाढलेल्या प्रदूषणामागे अनेक घटक जबाबदार असल्याचे सांगण्यात येत आहे. सुट्ट्यांच्या काळात अलिबागमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटकांची वर्दळ वाढते. वाहनांच्या धुरामुळे नायट्रोजन डायऑक्साइड आणि कार्बन मोनॉक्साईडचे प्रमाण हवेत वाढले आहे. परिसरात सुरू असलेली मोठी गृहनिर्माण प्रकल्प आणि पायाभूत सुविधांची बांधकामे यामुळे धुळीचे कण हवेत मिसळत आहेत. थंडीच्या दिवसात जमिनीलगतची हवा थंड असल्याने प्रदूषके वर जाऊ शकत नाहीत, परिणामी हवेत धुरके तयार होऊन श्वास घेण्यास त्रास होतो. आरोग्यावर होणारे परिणाम आणि खबरदारी हवेची गुणवत्ता खालावल्याने स्थानिक नागरिक आणि पर्यटकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि श्वसनाचा त्रास असलेल्या रुग्णांना याचा मोठा फटका बसू शकतो. प्रशासनाने नागरिकांसाठी आरोग्य सूचना जाहीर केल्या आहेत. घराबाहेर पडताना शक्य असल्यास मास्कचा वापर करावा, सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा मोकळ्या हवेत व्यायाम करणे टाळावे, डोळ्यांची जळजळ किंवा घसा खवखवणे यांसारखी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
अलिबाग हे प्रामुख्याने प्रदूषणमुक्त हवेसाठी ओळखले जाते. मात्र, आता येथील हवेची स्थिती पाहता पर्यटकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. जर ही स्थिती कायम राहिली, तर पर्यटनावर आधारित स्थानिक अर्थव्यवस्थेला फटका बसू शकतो. पर्यटकांनी अलिबागला येताना हवेच्या स्थितीचा अंदाज घेऊन येण्याचे आवाहनही काही स्तरांतून केले जात आहे. मुंबईच्या प्रदूषणापासून दूर राहण्यासाठी अनेक जण अलिबागचा रस्ता धरतात, मात्र आता अलिबागची हवाही मुंबईसारखीच दूषित होत असल्याचे चित्र दिसत आहे. पर्यावरणाचे रक्षण आणि प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. विकासाच्या ओघात अलिबागचे नैसर्गिक सौंदर्य आणि शुद्ध हवा टिकवून ठेवणे हे आता मोठे आव्हान ठरत आहे.