उजनी धरणातून पंधरा जानेवारीपासून रब्बी पिकांसाठी पाणी सोडणार

सोलापूरची जीवनवाहिनी असलेल्या उजनी धरणातून रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. येत्या पंधरा जानेवारीपासून उजनीतून शेतीसाठी पाण्याचे पहिले आवर्तन सोडले जाणार आहे. विशेष म्हणजे, सध्या आचारसंहिता लागू असल्याने कालवा सल्लागार समितीची बैठक न घेता, प्रशासकीय पातळीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

सोलापूर जिल्हा आणि आसपासच्या लाभक्षेत्रासाठी उजनी धरण हा पाण्याचा मुख्य स्रोत आहे. यंदा उजनी धरण शंभर टक्के भरलेले असून, सध्या धरणात एकशे सतरा टीएमसी इतका एकूण पाणीसाठा उपलब्ध आहे. रब्बी हंगामातील पिकांच्या गरजेनुसार शेतकऱ्यांकडून पाण्याची मागणी होत होती. मात्र, महापालिका निवडणुकांमुळे सध्या आचारसंहिता लागू आहे, त्यामुळे पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणारी कालवा सल्लागार समितीची बैठक घेता येणार नाही. प्रशासकीय परवानगीने पाणी सुटणार आचारसंहितेच्या अडथळ्यामुळे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता एस. एस. खांडेकर यांनी राज्याच्या जलसंपदा विभागाच्या सचिवांशी संपर्क साधला आहे. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने पंधरा जानेवारीच्या सुमारास पहिले आवर्तन सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आचारसंहिता संपल्यानंतर उर्वरित पाण्याचे नियोजन करण्यासाठी कालवा सल्लागार समितीची औपचारिक बैठक घेतली जाईल. आवर्तनाचे स्वरूप आणि कालावधी रब्बी हंगामाचे हे पहिले आवर्तन साधारणपणे चाळीस दिवसांचे असणार आहे. यासाठी अंदाजे सहा टीएमसी पाणी वापरले जाईल. यामध्ये उजवा कालवा, डावा कालवा, दहिगाव उपसा सिंचन योजना, सीना-माढा उपसा सिंचन योजना आणि बोगद्यातून पाणी सोडले जाईल. या आवर्तनानंतर रब्बीचे दुसरे आवर्तन पंधरा मार्चनंतर सोडण्याचे प्राथमिक नियोजन आहे.

सोलापूर शहराच्या पाण्याचे नियोजन सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्याने सध्या तळ गाठला आहे. तिथे केवळ दहा ते बारा दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र, सोलापूर ते उजनी दरम्यान समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्याने आता भीमा नदीतून पिण्यासाठी विशेष पाणी सोडण्याची गरज भासणार नाही. जेव्हा शेतीसाठी नदीतून पाणी सोडले जाईल, तेव्हा औज बंधारा आपोआप भरला जाईल, असे महापालिका प्रशासनाचे नियोजन आहे. या समांतर जलवाहिनीमुळे नदीतून सोडल्या जाणाऱ्या सुमारे वीस टीएमसी पाण्याची बचत होणार आहे, ज्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होऊन यंदा उन्हाळ्यात तीन आवर्तने मिळण्याची शक्यता वाढली आहे. धरणात त्रेपन्न पूर्णांक सत्तावन्न टीएमसी इतका उपयुक्त साठा असल्याने यंदा पाण्याची कमतरता भासणार नाही. वेळेवर पाणी सुटणार असल्याने रब्बी हंगामातील गहू, हरभरा आणि ज्वारी या पिकांना मोठा आधार मिळणार आहे.






1,353 वेळा पाहिलं