दुर्गम भागातील आरोग्य सुविधा बळकटीकरणास प्राधान्य देणार – प्रकाश आबिटकर

राज्यातील आदिवासी आणि दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळवून देणे हे सरकारचे प्राथमिक कर्तव्य आहे. या भागातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम आणि बळकट करण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न करावेत, असे स्पष्ट निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत. मंत्रालयातील समिती सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. काही दिवसांपूर्वी आरोग्यमंत्र्यांनी स्वतः अमरावती, मेळघाट, अकोला, जळगाव, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या जिल्ह्यांतील विविध आरोग्य संस्थांना भेटी देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली होती. या भेटीदरम्यान त्यांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्या होत्या. त्या सूचनांवर आतापर्यंत काय कार्यवाही झाली, याचा सविस्तर आढावा घेण्यासाठी या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

बैठकीत बोलताना नामदार आबिटकर यांनी अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील आरोग्य संस्थेच्या सद्यस्थितीवर चर्चा केली. दुर्गम भागातील रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी या संस्थेचे श्रेणीवर्धन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच, अनेक ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. ही रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, जेणेकरून मनुष्यबळाअभावी आरोग्य सेवा विस्कळीत होणार नाहीत, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. केवळ औषधोपचार पुरेसे नसून रुग्णालयातील वातावरणही आरोग्यदायी असावे, यावर आरोग्यमंत्र्यांनी विशेष भर दिला. राज्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये स्वच्छतेचे कडक निकष पाळले जावेत. तसेच, ग्रामीण व आदिवासी भागातील रुग्णांना दिला जाणारा आहार हा सकस आणि दर्जेदार असावा. आहार व्यवस्थेत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी प्रशासनाला दिला.

मेळघाट आणि आसपासच्या आदिवासी पट्ट्यात रक्तक्षय आणि सिकलसेल यांसारख्या आजारांचे प्रमाण चिंताजनक आहे. हे लक्षात घेऊन मेळघाटात रक्तक्षय निर्मूलन मोहीम आणि सिकलसेल तपासणी मोहीम अधिक प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी ग्रामविकास विभागाशी समन्वय साधून त्यांच्याशी संबंधित पदे भरण्याबाबतही आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश मंत्र्यांनी दिले. राज्यातील दुर्गम भागातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्यासाठी सर्व आदिवासी जिल्ह्यांमध्ये विशेष आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या शिबिरांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी आणि मोफत औषधोपचार उपलब्ध करून दिले जाणार आहेत.






14,244 वेळा पाहिलं