राज्यातील प्रलंबित जिल्हा परिषदांची निवडणूक जाहीर

राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा बिगुल फुंकला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या 15 फेब्रुवारीपर्यंतच्या मुदतीचे पालन करत निवडणूक आयोगाने हा महत्त्वपूर्ण निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. पाच फेब्रुवारी रोजी हे मतदान पार पडेल. सात फेब्रुवारीला मतमोजणी होईल. 16 जानेवारी ते 21 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येतील. या अर्जांची छाननी 22 जानेवारीला केली जाईल. अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी ही असेल. अंतिम याद्या, चिन्ह वाटप 27 जानेवारीला दुपारी साडेतीन नंतर होईल.

जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला दोन मत देणे बंधनकारक आहे. त्यातील एक मत जिल्हा परिषदेसाठी आणि एक मत पंचायत समिती गणासाठी द्यावे लागेल. तसेच या निवडणुकीसाठी नामनिर्देश प्रतिक्रिया ही ऑफलाइन पद्धतीने राबवली जाणार आहे अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर या जिल्हा परिषदांची निवडणूक आता होणार आहे

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रदीर्घ काळापासून प्रलंबित होत्या. राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन, प्रशासकीय अडचणी आणि आगामी दहावी-बारावीच्या परीक्षांचे कारण देत निवडणुकांसाठी मुदतवाढ मागितली होती. सर्वोच्च न्यायालयाने ही विनंती अंशतः मान्य करत, ज्या जिल्ह्यांमध्ये आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेलेली नाही, अशा बारा जिल्हा परिषदा आणि एकशे पंचवीस पंचायत समित्यांच्या निवडणुका 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, या निवडणुकांसाठीची आचारसंहिता तात्काळ लागू झाली आहे. जिल्हाधिकारी स्तरावर मतदान केंद्र निश्चिती, कर्मचारी नियुक्ती आणि ईव्हीएम मशीनची तपासणी सुरू करण्यात आली आहे.






4,871 वेळा पाहिलं