आसाममध्ये पाणीमेटेकामुळे महिलांना आत्मनिर्भरतेची संधी

निसर्गातील एखाद्या समस्येला संधीमध्ये कसे रूपांतरित करावे, याचे उत्तम उदाहरण आसामच्या ग्रामीण भागातून समोर आले आहे. एकेकाळी पर्यावरणासाठी आणि जलचरांसाठी कर्दनकाळ ठरलेली ‘पाणीमेटेका’ ही वनस्पती आता आसाममधील ग्रामीण महिलांच्या आर्थिक उन्नतीचा कणा बनली आहे. ब्रिटिशांनी केवळ आपल्या बागांच्या सौंदर्यासाठी आणि निळ्या फुलांच्या आकर्षणासाठी ही वनस्पती भारतात आणली होती. मात्र, अल्पावधीतच या वनस्पतीची वाढ इतकी अनियंत्रित झाली की तिने आसाममधील नद्या, तलाव आणि ओढ्यांचा पृष्ठभाग पूर्णपणे व्यापून टाकला. यामुळे पाण्यातील सूर्यप्रकाश आणि प्राणवायू रोखला गेल्याने मासे व इतर जलचर मोठ्या प्रमाणावर मृत होऊ लागले होते. डासांच्या उत्पत्तीचे केंद्र आणि जलमार्गातील अडथळा बनल्यामुळे स्थानिक लोक तिला ‘हिरवा शाप’ म्हणू लागले होते.

गेल्या काही वर्षांपासून आसाममधील स्वयंसेवी संस्था आणि ग्रामीण स्वयं-सहायता गटांनी या समस्येकडे एका नव्या व्यावसायिक दृष्टीकोनातून पाहिले. ‘टाकाऊतून संपत्ती’ या संकल्पनेवर आधारित एका विशेष उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. पाणीमेटेकाच्या देठांमध्ये असलेले लवचिक आणि मजबूत तंतू हे विविध वस्तू बनवण्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले. महिलांनी या वनस्पतीचे देठ वाळवून, त्यावर प्रक्रिया करून त्यापासून धागे आणि दोऱ्या मिळवण्याचे तंत्र आत्मसात केले. आज हीच जलवनस्पती आसाममधील घराघरांत रोजगाराचे साधन बनली असून ‘शापापासून संपत्तीकडे’ जाणारा हा प्रवास संपूर्ण देशासाठी मार्गदर्शक ठरत आहे.

आसाममधील माजुली, मोरीगाव, तिनसुकिया, धेमाजी आणि कोकराझार यांसारख्या अनेक जिल्ह्यांतील महिलांनी या हस्तकलेत आपले भविष्य शोधले आहे. योग्य प्रशिक्षण मिळाल्यानंतर या महिलांनी पाणीमेटेकापासून केवळ साध्या वस्तूच नव्हे, तर जागतिक दर्जाच्या पिशव्या, मेजावरील चटया, टोपल्या, गृहसजावटीचे पडदे आणि फाईल्स तयार करण्यास सुरुवात केली आहे. शासनाने या महिलांना कमी व्याजदरात कर्ज आणि आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून दिल्याने अनेक महिलांचे वार्षिक उत्पन्न आता एक लाख रुपयांच्या पुढे गेले आहे. ग्रामीण भागात जिथे उत्पन्नाची साधने मर्यादित होती, तिथे आता महिला दरमहा आठ ते दहा हजार रुपये कमावून आपल्या मुलांचे शिक्षण आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह स्वाभिमानाने करत आहेत.

पाणीमेटेका उद्योगाने आता आधुनिक तंत्रज्ञानाची जोड घेत मोठी भरारी घेतली आहे. गुवाहाटीसारख्या शहरात काही तरुण उद्योजकांनी या वनस्पतीपासून कोणताही रासायनिक वापर न करता ‘हस्तनिर्मित तयार करण्याचे उद्योग सुरू केले आहेत. हा कागद अत्यंत टिकाऊ आणि देखणा असल्याने त्याला चित्रकार आणि लेखकांकडून मोठी पसंती मिळत आहे. याव्यतिरिक्त, पाणीमेटेकापासून बनवलेल्या योगा मॅट्स सध्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विकल्या जात आहेत. प्लास्टिक आणि रबरला हा एक नैसर्गिक व आरोग्यदायी पर्याय म्हणून समोर आला आहे. यामुळे निसर्गातील कचरा कमी होण्यासोबतच पर्यावरणाचे रक्षण होण्यासही मोठी मदत होत आहे.

हे वर्ष या कलेसाठी महत्वाचे ठरले, कारण ‘आसाम पाणीमेटेका क्राफ्ट’ला अधिकृतपणे ‘भौगोलिक निर्देशांक’ प्राप्त झाला. या मानांकनामुळे आसामच्या या स्थानिक कलेला जागतिक स्तरावर एक वेगळी ओळख आणि विश्वासार्हता मिळाली आहे. यामुळे मध्यस्थांची साखळी कमी होऊन स्थानिक कारागिरांना त्यांच्या मालाचा योग्य मोबदला आणि सन्मान मिळू लागला आहे. पाणीमेटेका गोळा केल्यामुळे स्थानिक जलाशयांचे शुद्धीकरण होत आहे, ज्यामुळे मासेमारीला पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. अशा प्रकारे पर्यावरणाचे रक्षण आणि आर्थिक समृद्धी यांचा सुवर्णमध्य आसामच्या या महिलांनी साधला आहे.






6,384 वेळा पाहिलं